फोटो - NSK26H10054
नाशिक महानगरपालिका/विश्लेषण
---------------------------
त्याच सोंगट्या; तोच सारीपाट!
विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा
गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीत शंभर प्लसचा नारा देणाऱ्या भाजपचा दावा पूर्णपणे सफल झाला नसला तरी बहुमताच्या जादुई आकड्याच्या पलीकडे नाशिककरांनी भाजपला मतदान केले. भाजपने पहिल्यापासूनच कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेली विकास कामे डोळ्यासमोर ठेवून प्रचाराचा रोख ठेवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ केला. त्याचे ‘प्रेझेंटेशन’ मतदारांसमोर केले होते, त्याची भेटच जणू नाशिककरांनी त्यांना दिली.
नगरपालिका निवडणुकांत शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक चांगले यश मिळाले. या यशामुळे दोन इंच जमिनीवर गेलेल्या शिवसेनेने महायुती करताना भाजपकडे ५० हून अधिक जागा मागितल्या. परंतु भाजपकडे १०७७ इच्छुकांनी मुलाखती दिल्याने शिवसेनेसोबत युती परवडणारी नाही, युती करायची ठरली तर शिवसेनेला ३० पेक्षा अधिक जागा द्यायच्या नाहीत असा निर्णय होता. मात्र शेवटपर्यंत भाजपने हा निर्णय जाहीर केला नाही. अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत युती म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर भाजप स्वबळावर मैदानात उतरला. भाजपने ११८ ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यात ५० टक्क्यांहून अधिक यश पदरात पडले. शिवसेनेला मात्र सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. २८ पर्यंतच शिवसेनेचा आकडा थांबला व राष्ट्रवादीला चारपेक्षा अधिक जागा मिळविता आल्या नाहीत. किमान राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेत प्रवेश मिळण्याइतपतच यश मिळाले. शिवसेना आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून महापालिकेच्या सभागृहात बसेल. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदारांनी सत्तेच्या दहा टक्के वाटा देऊन अस्तित्व अबाधित ठेवले आहे. काँग्रेसने मुस्लिम पट्ट्यात तीन जागा निवडून आणत अस्तित्वाची मर्यादा स्पष्ट केली. एकेकाळी मनसेचा नाशिक हा बालेकिल्ला होता. मात्र टप्प्याटप्प्याने नगरसेवकांची संख्या कमी होत गेली. यंदा अवघ्या एका जागेवर मनसेला मर्यादित ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माकपा, वंचित व आम आदमी पक्षांना भोपळादेखील फोडता आला नाही. नाशिककरांनी प्रमुख पक्षांना त्यांच्या ताकदीप्रमाणे यश दिले. त्यामुळे आता भविष्यात प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली असून किमान त्या अस्तित्वाच्या जाणिवेतून आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान आहे, तर भाजपने नाशिककरांना दिलेले विकासाचे आश्वासन पार पाडणे महत्त्वाचे ठरेल.
------------------------------------------
मालेगाव महापालिका विश्लेषण
-------------------------
फोटो - NSK26H10022
विकास ‘व्हिजन’ मांडणाऱ्या इस्लाम पक्षाकडे किल्ली
----
गोकुळ खैरनार
मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक पूर्व व पश्चिम अशा दोन विभागात झाली. पूर्व भागात मौलाना मुफ्ती व आसिफ शेख या आजी - माजी आमदारांमध्ये अस्तित्वाची लढाई होती. अन्सारी मते आपल्याकडे खेचण्यासाठी शेख यांनी त्यांच्या इस्लाम पक्षाबरोबर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या समाजवादी पक्षाशी युती केली. ‘सेक्युलर फ्रंट’चा हा प्रयोग खूपच यशस्वी झाला. इस्लाम पक्षाने ३५ तर समाजवादी पक्षाने ६ जागा जिंकल्या. ८४ सदस्यीय सभागृहात बहुमतासाठी त्यांना केवळ दोन सदस्यांची गरज आहे. ‘एमआयएम’ने वैयक्तिक टीका टिप्पणीच्या प्रचाराला मतदारांनी नाकारत मालेगाव विकासाचे ‘व्हिजन’ मांडणाऱ्या इस्लाम पक्षाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले.
‘एमआयएम’ला केवळ २१ जागांवर समाधान मानावे लागले. स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपला मतदारांनी नाकारले आहे. पक्षाला केवळ दोनच जागा जिंकता आल्या. काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. जवळपास डझनभर पक्षांना खातेही उघडता आले नाही. कॅम्प संगमेश्वरच्या पश्चिम भागात अखेरच्या क्षणी भाजपने स्वबळाचा नारा देत मंत्री दादा भुसे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रचार सभा, मंत्री गिरीश महाजन यांची भाजपचा महापौर होण्याची गर्जना, १५ ते १७ जागा जिंकण्याचा नेत्यांना आत्मविश्वास, भुसे व त्यांच्या समर्थकांवर टीका टिप्पणी असे सर्व प्रयोग फेल गेले. याउलट प्रचारसभांमधून विकासावरच भर दिल्याने पश्चिम भागातील पाच प्रभागातील २० पैकी १८ जागांवर विजय मिळवत भुसेंचाच करिश्मा कायम असल्याचे दाखवून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.