पुस्तक आदानप्रदान उपक्रम गुंडाळला
नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन; जागा अपुरी पडल्याचा दावा
दीपिका वाघ : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१: पुण्यात झालेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात ग्रंथ प्रदर्शनात पुस्तक आदानप्रदान या महत्वाकांक्षी उपक्रमातून तीन दिवसात तब्बल ३५ हजार पुस्तकांची देवाणघेवाण झाली होती. हा अनोखा उपक्रम नाशिकच्या संमेलनात राबविला जाणार होता, परंतु नाशिकच्या संमेलनात हा उपक्रमच बासनात गुंडाळून ठेवण्यात आला.
मराठी भाषा विभागातर्फे घेण्यात येणारी सुरवातीची दोन संमेलने मुंबईत तर तिसरे पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालयात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले होते. नाशिकला कविवर्य कुसुमाग्रज व प्रा. वसंत कानेटकर यांच्यासारख्या साहित्यिक वारशामुळे संमेलनात किमान लाखभर पुस्तके जमा होतील, असा विश्वास उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर फेब्रुवारीत मविप्र संस्थेच्या आयएमआरटी सभागृहात झालेल्या संमेलनाच्या नियोजन आढावा बैठकीत संमेलनात दोनशे पुस्तकांचे स्टॉल असतील व पुस्तक आदान प्रदान उपक्रम राबविला जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र नाशिकच्या संमेलनातून हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात आलाच नाही. या ठिकाणी लाखभर पुस्तकांची देवाण घेवाण होण्याची शक्यता असताना प्रत्यक्षात हा उपक्रम विस्मरणात गेल्याचे बघायला मिळाले. संमेलनात एकूण दीडशे पुस्तकांचे स्टॉल असून त्यापैकी तीस दालने शासकीय ग्रंथाची होती.
असा आहे पुस्तक आदान प्रदान उपक्रम
संमेलनात पुस्तक खरेदी विक्री बरोबरच पुस्तकांचे आदान प्रदान करणे. पुस्तक वाचून झाल्यानंतर ते बऱ्याचदा पडून राहते त्या पुस्तकांचा इतर वाचकांना उपयोग व्हावा म्हणून वाचलेले पुस्तक जमा करणे व त्या मोबदल्यात हवे असणारे पुस्तक घेऊन जाणे. पुस्तकांचे मोल असावे म्हणून नाममात्र दहा रुपये शुल्क आकारले जातात. थोडक्यात वाचून झालेले जुने पुस्तक दहा रुपये शुल्क भरून नवीन पुस्तकासोबत बदलता येईल.
आयोजक म्हणतात जागा अपुरी
आयोजकांच्या मते, केटीएचएम महाविद्यालयाचे प्रांगण कमी पडत असल्याने हा उपक्रम राबविण्यात आला नाही. याउलट पुण्यात हा उपक्रम राबविण्यासाठी मोठे प्रांगण उपलब्ध झाल्याने उपक्रम राबविला गेला असल्याचे उत्तर आयोजकांच्या वतीने देण्यात आले.
फोटो : १३४६२
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.