कांद्याचा फोटोवापरावा बातमीत
दुष्काळाचे कांदा उत्पादनाला ग्रहण
पारनेर बाजार समितीत आवक घटण्याची शक्यता; भाववाढीचे संकेत
मार्तंड बुचुडे ः सकाळ वृत्तसेवा
पारनेर, ता. १५ : पारनेर तालुक्यात यंदा कांदा उत्पादनावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून आगामी सहा महिन्यांत बाजार समितीतील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बहुतांश भागांतील विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने पाण्याअभावी हजारो एकरांवरील कांदा पीक जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन घटून बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या सहा महिन्यांत सुमारे ९ लाख ४१ हजार ५२ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या काळात कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार १२ रुपयांपासून ४ हजार २५ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी समाधानी असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी मार्च २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत बाजार समितीत सुमारे १७ लाख ८० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्या तुलनेत यंदा आतापर्यंत सुमारे ५० टक्के आवक झाली आहे. मात्र आगामी काळात पाण्याची टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील कुकडी कालव्याखालील चौदा गावे वगळता इतर भागातील कांदा पिकाला पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. विशेषतः पठार भागात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यंदाही चांगली लागवड झाली असली, तरी पाण्याअभावी हे पीक वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
कांदा हे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी नगदी उत्पन्न देणारे महत्त्वाचे पीक आहे. अनेक शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आर्थिक उलाढालीचा मोठा आधार कांदा पिकावर असतो. कुकडी कालव्याखालील चौदा गावांमधील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीकडे वळले आहेत. उसाला मिळणारा तुलनेने कमी बाजारभाव आणि त्यासाठी लागणारा अधिक कालावधी विचारात घेता कांदा पीक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सोयीचे वाटत आहे. त्यामुळे बागायती पट्ट्यातही कांदा लागवडीचे प्रमाण वाढले आहे.
मात्र तालुक्यातील इतर भागात झालेल्या कांदा लागवडीला पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदा शिल्लक नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे आगामी हंगामात उत्पादन आणि बाजार समितीतील आवक या दोन्हींवर परिणाम होऊ शकतो. आवक घटल्यास त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे आणि उपलब्ध पाणीसाठ्याकडे लागले आहे.
च
पारनेर बाजार समितीतील कांदा आवक व कंसात सरासरी बाजारभाव
मे ः १४१५३ (१०१२)
जून ः १०४४१२ (१४२७)
जुलै ः १६१६९० (१८०७)
ऑगस्ट ः १६५०१४ (२९९२)
सप्टेंबर ः १२७२१५ (३९८४)
ऑक्टोबर ः ९७,२२५ (३८८४)
नोव्हेंबर (आजअखेर) ः ३६५१८ (४०२५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.