पळसदेव, ता. ३० : पळसदेव (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने महिनाभरात तब्बल ३६ लाख रुपयांची कर वसुली केली आहे. थकबाकीदारांना ५० टक्के सवलत देण्याच्या योजनेमुळे नागरिकांनी कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.
पळसदेव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची थकबाकी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या आसपास होती. अनेकांचा हजारो रुपयांचा कर थकल्याने त्यांची कर भरण्याची मानसिकता नव्हती. मात्र ग्रामपंचायतीला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ५० टक्के कर सवलत योजनेचा ग्रामस्थांनी फायदा घेत कर भरण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गर्दी केली होती. आज दिवसभरात सुमारे साडेपाच लाख रुपयांचा कर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी जमा करून घेतला. या योजनेमुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होऊन, गावातील विकासकामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
सरपंच कोमल सुभाष बनसुडे म्हणाल्या की, ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावा, तसेच ग्रामपंचायती स्वतःच्या उत्पन्नातून विकासकामे करू शकतील, यासाठी शासनाने हे अभियान सुरू केले आहे. कर वसुलीमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त उद्दिष्ट गाठणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून कोट्यवधी रकमेचा विकासनिधी बक्षीस म्हणून दिला जाणार आहेत. या निधीच्या आमिषाने आणि सवलत योजनेमुळे वसुली मोहिमेला गती मिळाली आहे.
शासनाने दिलेली ५० टक्के कर सवलतीची ही सुवर्णसंधी आहे. यामुळे थकबाकीदार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली थकबाकी भरून ग्रामपंचायतीला सक्षम बनवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन बनसुडे यांनी केले.