panchnama
panchnama 
पुणे

पंचनामा - बाई मी दळण दळण दळतो!

सु. ल. खुटवड

‘‘भ य्या, ऐसा कैसा दळता है?  और बारीक दळो ना! ऐसे दळनेसे भाकरी गोल कैसी होगी?’’ प्रज्ञाने पिठाच्या गिरणीतील भय्याला फटकारले. ‘‘भय्या, गहूपर गहूचच दळो! ज्वारीपर गहू दळता है, तो चपाती खाने को कचकच लगती है’’ स्वातीने सूचना केल्यानंतर भय्याने गिरणीचा आवाज वाढवला. आम्ही शेजारी निमूटपणे उभे राहून ऐकत होतो. थोड्या वेळाने उभ्या उभ्याच आमची ‘गोलमेज’ परिषद भरली.

‘‘मग काय म्हणते तुझी ऐश्‍वर्या राय? का अजून जुनंच दळण दळते.’’ स्वातीने फुलटॉस टाकला. ‘‘आम्ही गरिबीत कसे दिवस काढले आणि बबडूला कसा शिकवला?’’ हेच येता- जाता ऐकवत असते. कामाचं काही बोललं तर ‘म्हातारपणात तरी आराम करू दे. रग्गड खस्ता काढल्यात, असे ऐकवून निवांत टीव्ही बघत बसते. तिचा बबडूही तिचीच बाजू घेतो.’’ प्रज्ञाने आपली खंत व्यक्त केली. 

‘‘अन् तुझ्या करिना कपूरचं काय चाललंय?’’ प्रज्ञाने विचारलं. ‘‘अगं कशाचं आलंय? थोडं काम सांगितलं, की ‘आई गं माझी गुडघेदुखी’ असे म्हणत गुडघ्याला धरून बसते अन लेकीकडं जायचं म्हटलं, की दहा मजले एका दमात चढून जाते. तिथं स्वयंपाक-पाण्यासह भांडीही घासते,’’ स्वातीने आपल्या व्यथेला मोकळी वाट करून दिली. महिला मंडळाची ही ‘कोड लॅग्वेंज’ अनेकांना कळणार नाही. मात्र, हल्ली सासूला हिरॉइनच्या नावाने बोलायची फॅशन असल्याचे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्हीही चर्चेत सहभागी झालो. 

‘‘अहो, आमची सई ताम्हणकर तर तास-तासभर लेकीशी बोलत असते आणि त्यांची लेक मला भांडी घासा, कपडे धुवा आणि दळण आणा, असलीच कामं सांगते. पुरूषांचा जन्म फारच वाईट.’’ आम्हीही उसासा टाकला. मग आमच्याविषयी महिला मंडळाने सहानुभूती व्यक्त केली. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही आपापले दळणाचे डबे घेऊन घरी परतलो. 

खरं तर बायकोने सुरुवातीला आम्हाला दळण दळून आणा, असा आदेश दिल्याने आम्ही नाराज झालो होतो. आम्हाला असली किरकोळ कामे सांगतेस, असं म्हणून आकांडतांडव केला होता; पण बायको आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने आम्हाला नेहमीप्रमाणे माघार घ्यावी लागली. कोणतंही काम हसत-खेळत केल्यास, कामाचा ताण वाटत नाही व कोणतंही काम हलकं नसतं, या इतरांसाठी असलेल्या आमच्याच वाक्याचा स्वतःवरच आम्ही प्रयोग केला. मग ठेवणीतील कपडे काढून व भारीतला सेंट फवारून आम्ही दळण दळायला गेलो. सुरुवातीला आम्ही इतर महिलांसमोर बुजलो. नंतर आमची भीड चेपली. त्यामुळे दर तीन-चार दिवसांनी बायकोलाच आम्ही दळणाची आठवण करू देऊ लागलो. दळण घेऊन जाताना ठेवणीतील कपडे व सेंट वगैरे मारून जात असल्याने बायकोही चक्रावली.

काही दिवसांनी तिच्या मैत्रिणींनी ‘अगं पिठाच्या गिरणीजवळ उभा राहून, तुझा नवरा बायकांच्या घोळक्यात गप्पा मारत असतो. त्याला एवढा मोकळा सोडू नकोस’ असा सल्ला दिला. त्यावेळी बायकोची ट्यूब पेटली व आमच्या नटून-थटून जाण्यामागचे रहस्य तिला उलगडले. दुसऱ्या दिवशी आम्हाला बरोबर घेऊन फिनिक्स मॉल गाठले. तिथे पंचवीस हजारांची घरगुती पिठाची गिरणी तिने खरेदी केली. ‘‘अगं एवढा खर्च मला झेपणार नाही. मी परत कधीच दळण दळायला जाणार नाही, पण गिरणी नको.’’ अशी वारंवार विनंती आम्ही करत होतो. ‘तुम्ही जे अकलेचे दळण दळलेत, त्याला पंचवीस हजार रुपये दंड योग्य आहे. परत असं वागलात तर पन्नास हजारांचे भांडी घासायचे मशीन खरेदी करायला लावेन.’’ बायकोच्या या इशाऱ्यावर आम्ही मनातील विचारांचे दळणही थांबवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

SCROLL FOR NEXT