पंढरपूर वर्धापन दिन लेख
शेतीतून उद्योगाकडे;
पंढरपूरची अर्थक्रांती
पंढरपूरची ओळख विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीभूमीची असली, तरी तालुक्याच्या आर्थिक समृद्धीचा खरा आधार शेती आणि शेतीपूरक उद्योग ठरले आहेत. उजनी धरण, कालवे आणि नीरा उजवा कालव्यामुळे जिरायती शेतीचे रूपांतर बागायती शेतीत झाले आणि ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी यांसारख्या नगदी पिकांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली. त्यातून उभ्या राहिलेल्या साखर कारखान्यांनी शेतीला उद्योगाची जोड दिली, तर दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया आणि पर्यटनाने अर्थचक्र अधिक गतिमान केले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नासोबतच रोजगाराच्या संधीही वाढल्या. आता फलटण-पंढरपूर रेल्वे, कॉरिडॉर, एमआयडीसी आणि फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगांमुळे या अर्थव्यवस्थेला नवी झेप घेण्याची संधी आहे. मात्र पाण्याचा वाढता वापर, उसावरील अवलंबित्व आणि बदलते बाजारभाव यांसारख्या आव्हानांवर मात करत शाश्वत शेती-उद्योगाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.
- भारत नागणे
पंढरपूर म्हटले की डोळ्यासमोर येतो तो विठ्ठल आणि चंद्रभागा नदी. पण या भक्तीच्या गावाचा खरा आर्थिक पाया आहे तो शेती आणि शेतीवर आधारित उद्योग. एकेकाळी दुष्काळी पट्ट्यात गणला जाणारा पंढरपूर तालुका आज सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम तालुक्यांपैकी एक बनला आहे. या परिवर्तनामागे शेतीचे आधुनिकीकरण आणि वाढत्या फळ उद्योगांची जोड हेच मुख्य कारण आहे.
पंढरपूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे १ लाख ३० हजार हेक्टर आहे. यापैकी जवळपास १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. १९८० पूर्वी पंढरपूर तालुका हा जिरायती भाग म्हणून ओळखला जायचा. पण उजनी धरणाच्या निर्मितीनंतर आणि उजवा व डावा कालव्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शेती उद्योगाला खऱ्या अर्थाने गती आली. त्यातच नीरा उजवा कालव्यामुळे तालुक्यातील सिंचनाचे चित्र बदलले. कृषी विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार आज तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेती बागायती झाली आहे. यामुळे पारंपरिक ज्वारी, बाजरीच्या जागी ऊस, द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू यासारखी नगदी पिके आली.
पंढरपूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेत उसाचे योगदान ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आज एकट्या पंढरपूर तालुक्यात सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टरवर उसाची लागवड होते. सरासरी ८० ते १०० टन प्रतिहेक्टर उत्पादन मिळते. एका हंगामात तालुक्यातून सुमारे ३० ते ३५ लाख टन उसाचे गाळप होते. त्यातून शेतकऱ्यांच्या खिशात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. ऊस, डाळिंब आणि केळीच्या उत्पन्नातून अनेक शेतकरी लहान झोपड्यांतून मोठ्या बंगल्यात आले आहेत. तर कधी काळी सायकलसुद्धा मिळणे मुश्किल होते, तेच शेतकरी आज ५० लाखांच्या फॉर्च्युनरमधून फिरताना दिसत आहेत.
पंढरपूरलगतच्या भागात ऊस, तर कासेगाव, भाळवणी परिसरात द्राक्ष आणि डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. गेल्या ५ वर्षांत डाळिंबाचे क्षेत्र ४ हजार हेक्टरवरून ७ हजार हेक्टरपर्यंत गेले आहे. चंद्रभागेच्या काठावरील गावांमध्ये केळी आणि भाजीपाल्याने शेतकऱ्यांना ३-४ महिन्यांत उत्पन्न देणारे मॉडेल दिले आहे.
शेतीतून थेट उद्योगाकडे प्रवास
१. साखर उद्योग
गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा तालुक्यातील सर्वात जुना आणि मोठा कारखाना आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. माजी आमदार (कै.) औंदुंबर पाटील यांनी कारखाना यशोशिखरावर नेला. सध्या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७ हजार टन इतकी आहे. तालुक्यातील अतिरिक्त उसाचे गाळप व्हावे यासाठी माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांनी श्रीपूर येथे पांडुरंग, तर (कै.) वसंतराव काळे यांनी भाळवणी येथे चंद्रभागा साखर कारखान्याची निर्मिती केली. त्यानंतर तालुक्यात अनेक खासगी साखर उद्योग उभे राहिले. तालुक्यातील एका साखर कारखान्याची ऊस गाळप हंगामात सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांची उलाढाल होते. ऊसतोडणी, वाहतूक, कारखान्यातील रोजगार यातून थेट ५० हजारांहून अधिक कुटुंबांना त्याचा फायदा होतो. अलीकडे मात्र साखर उद्योगातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक शेतकरी पर्यायी पीक पद्धतीकडे वळल्याने साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत आहे.
२. दुग्ध व्यवसाय
उसाच्या जोडीला दूध हा दुय्यम व्यवसाय नाही, तर मुख्य व्यवसाय झाला आहे. पंढरपूर तालुक्यात रोज सुमारे २.५ ते ३ लाख लिटर दुधाचे संकलन होते. तालुक्यातून अनेक खासगी दूध संस्थांना दुधाचा पुरवठा केला जातो. दुधाच्या माध्यमातून शेतकऱ्याला दररोज रोख पैसा मिळतो.
३. पर्यटन अर्थव्यवस्था
शेती व शेतीपूरक उद्योगांबरोबरच पंढरपूरला पर्यटनातून चांगले उत्पन्न मिळते. पंढरपूरला वर्षाला सुमारे १ कोटीहून अधिक भाविक भेट देतात. आषाढी यात्रेला एकाच वेळी १५ ते २० लाख भाविक येतात. यात्रा काळात हॉटेल, लॉजिंग, प्रसाद विक्री, हार-फुले, वाहतूक या माध्यमातून सुमारे ३०० ते ४०० कोटींची आर्थिक उलाढाल होते. एका छोट्या टपरीवाल्यापासून ते मोठ्या हॉटेल व्यावसायिकापर्यंत सर्वांची रोजीरोटी वारीवर चालते.
४. कृषी प्रक्रिया आणि सेवा उद्योग
उसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती (को-जनरेशन), इथेनॉल प्रकल्प, सेंद्रिय खत निर्मिती हे नवीन उद्योग तालुक्यात येत आहेत. पंढरपूरातील एमआयडीसीचाही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. सांगोला रोडवर कासेगाव येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. येथे १५० पेक्षा जास्त छोटे-मोठे उद्योग सुरू होतील, असे नियोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी सुरू झाल्यानंतर उद्योग-व्यवसायांना अधिक चालना मिळणार आहे.
प्रगती झाली, पण आव्हाने कायम
प्रगती झाली असली तरी आव्हाने कायम आहेत. पाण्याचा अतिवापर, उसावरचे एकपिकाचे अवलंबित्व, साखरेचे पडणारे दर आणि वाढती बेरोजगारी हे प्रश्न अजूनही तालुक्यात आहेत. तज्ज्ञांच्या मते, आता पंढरपूरला पुढील १० वर्षांत काही गोष्टी कराव्या लागतील :
१. फलटण-पंढरपूर रेल्वे आणि कॉरिडॉर प्रकल्पामुळे लॉजिस्टिक आणि पर्यटन उद्योगात मोठी वाढ होईल.
२. द्राक्ष, डाळिंबावर आधारित कोल्ड स्टोरेज आणि निर्यातक्षम प्रक्रिया उद्योग उभा करावा लागेल.
३. शेतात पिकवायचे, कारखान्यात प्रक्रिया करायची आणि विठ्ठलाच्या नावाने बाजारपेठेत विकायचे. हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करावे लागणार आहे. तरच शेती उद्योगाची भरभराट शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.