गदारोळ आणि घोषणाबाजीत
संपले पावसाळी अधिवेशन
सत्ताधारी-विरोधकांचा एकमेकांवर हल्लाबोल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेचे कामकाज गुरुवारी (ता. १३) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
कामकाज सुरू होण्यापूर्वी संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी ‘मंकी टॉय’ घेऊन निदर्शने केली, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. संपूर्ण पावसाळी अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांच्या गदारोळातच वाहून गेले. विशेष म्हणजे, या संपूर्ण अधिवेशनात केवळ १५ तास काम होऊ शकले.
पंतप्रधान, गृहमंत्री घाबरतात : महुआ मोइत्रा
सत्ताधारी पक्षाच्या आंदोलनाबाबत विचारले असता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा म्हणाल्या, ‘‘तुम्ही असे कधी पाहिले आहे का? गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असलेले सरकार संसदेत विरोधी पक्षनेत्याविरोधात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देत आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत येण्यास घाबरत आहेत. पंतप्रधान संपूर्ण अधिवेशनात संसदेत आलेच नाहीत.’’
राहुल गांधी भगोडे आहेत : रविशंकर प्रसाद
भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘‘राहुल गांधी बऱ्याच वेळापासून गदारोळ करत होते, आपले म्हणणे मांडण्याची आणि बोलण्याची परवानगी मागत होते. तरीही जेव्हा अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले, की ते २४ तास चर्चा ऐकण्यास आणि उत्तर देण्यास तयार आहेत, तेव्हा राहुल गांधी का पळून गेले? राहुल गांधी हे भगोडे आहेत; ते फक्त राजकीय स्टंटबाजी करतात.’’
विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी घेरले
लोकसभेच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार पावसाळी अधिवेशनात एकूण १९ बैठका प्रस्तावित होत्या. मात्र संपूर्ण अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये सातत्याने संघर्ष पाहायला मिळाला. अनेकदा गदारोळ आणि निषेधामुळे सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले.
विरोधकांनी विविध विषयांवर सरकारकडे उत्तराची मागणी केली, तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना सभागृहात चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून विरोधक सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उत्तराची मागणी करत होते.
अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीनुसार उत्तर देण्यास संमती दर्शवली आणि ते या मुद्द्यावर सभागृहात उत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. गुरुवारी ते सभागृहात या मुद्द्यावर आपली बाजू मांडतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.