PCMC-Water-Issue
PCMC-Water-Issue 
पुणे

#PCMCIssues तहान भागेना

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - शहरातील निम्म्या लोकांना मानंकानुसार ठरलेला पाणीपुरवठा होत नाही. कारण शहराच्या अनेक भागांतून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे.

सत्ताधारी पक्षातील काही जण या प्रस्तावाला अनुकूल असल्यामुळे, पुणे शहरातील पाणीकपातीपाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपात होऊ शकते. या महिन्यातील सर्वसाधारण सभेनंतर याची अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नगरसेवकांनी पाणीटंचाईबाबत सर्वसाधारण सभेत आवाज उठविल्यास यातून काही मार्ग काढता येईल, यावर चर्चा होऊ शकेल.

महापौर राहुल जाधव आणि आमदार महेश लांडगे यांनीही अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत गेल्या आठवड्यात दोन बैठका घेतल्या. त्या वेळी अनेक नगरसेवकांनी त्यांच्या भागातील पाणीटंचाईचे मुद्दे मांडत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्याच वेळी शहराच्या एका भागातील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद ठेवल्यास, रोज ७० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची बचत होईल. ते पाणी अन्य भागात पुरविल्यास सर्वांना पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असा मुद्दा प्रशासनाने चर्चेत मांडला होता. त्यामुळे पाणीकपातीसाठी प्रशासनाची पावले पडू लागल्याचे दिसून आले.

शहरात निगडी जलशुद्धीकरण केंद्रातून ४९० एमएलडी, तसेच एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाण्याचे वितरण केले जाते. त्यामुळे वर्षभरात सुमारे सहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दिले जाते. प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी हे मानक धरल्यास आणि शहराची लोकसंख्या २२ लाख गृहीत धरल्यास, शहराला साडेचार ते पावणेपाच टीएमसी पाणी वर्षभरासाठी पुरेसे ठरते. शहराला जादा पाणी लागल्यास जादा किंमत आकारून ते देण्याची तयारी जलसंपदा विभागाने दाखविली आहे. त्यामुळे शहरांतर्गत पाणी वितरण हीच खरी समस्या आहे. ती सोडविल्यास पाणीकपातीची गरजच भासणार नाही.

महापालिकेची कागदपत्रे पाहिल्यास जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत पवना जलवाहिनीचे काम हाती घेतले, त्या वेळी २०१०-११ मध्येच वितरण व्यवस्था सुधारण्यासाठीची सर्व कामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्याव्यतिरिक्त शहराच्या ४० टक्के भागात २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे तेथील पाणीगळतीचे प्रमाण कमी व्हायला हवे. त्यातच शहराच्या उर्वरित साठ टक्के भागातही अडीचशे कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे लक्षात घेतल्यास गळतीला आळा बसत असताना निम्म्या शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी कशामुळे आहेत, त्याचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे.

या भागात फारच कमी प्रमाणात पाणीपुरवठा
वाकड, थेरगाव, दापोडी, चऱ्होली, दिघी, मोशी, चिखली, तळवडे, डुडुळगाव, चोविसावाडी, जाधववाडी, चिंचवड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव. याव्यतिरिक्त महापालिकेच्या जुन्या भागातही उंचावरील भागात कमी पाण्याच्या समस्या जाणवत आहेत.

थेरगाव व चिंचवड ग्रॅव्हिटीवद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या भागात म्हणजेच लोहमार्गाच्या पश्‍चिम भागात ६५ टक्के नागरिकांना मानकापेक्षाही कमी पाणी मिळत आहे. प्राधिकरण, आकुर्डी, सेक्‍टर क्रमांक २२, चिखली, निगडी, तळवडे या भागात हेच प्रमाण ४१ टक्के आहे. चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, दिघी, बोपखेल, भोसरी, नेहरूनगर, अजमेरा कॉलनी, संत तुकारामनगर, खराळवाडी, कासारवाडी, फुगेवाडी या भागात हे प्रमाण सुमारे ५५ टक्के आहे.

शहराची पाण्याची गरज
४.५ ते ५ टीएमसी
मिळणारे पाणी ६ टीएमसी
प्रतिमाणशी कोटा १३५ लिटर

पाणीबचतीसाठी पालिकेचा होरा
- एक दिवस पाणी बंद केल्यास ७० एमएलडीची बचत
- ४० टक्के भागात २४ बाय ७ योजनेची कामे सुरू
- उर्वरित भागात २५० कोटींची जलवाहिन्यांची कामे सुरू

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. तसे न झाल्यास शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस बंद ठेवण्यात येईल. ते पाणी अन्य भागात पुरेशा दाबाने पुरविण्यात येईल. त्यामुळे सर्वांना पाणी मिळेल. पाणीपुरवठा न सुधारल्यास हा निर्णय घेण्यात येईल.
- राहुल जाधव, महापौर

नगरसेवकांनो हे विचाराच
 पवना जलवाहिनीचे काम करण्यास जलसंपत्ती प्राधिकरणाने गेल्या वर्षी परवानगी दिली, ते काम कधी सुरू होणार.
 पवना जलवाहिनीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक व निर्णय कधी घेणार.
 रावेत येथे नवीन बंधाऱ्याचे काम केव्हा सुरू करणार.
 २४ बाय ७ योजनेचे काम शहराच्या ४० टक्के भागात झाले, तेथील पाणीपुरवठा कधी सुधारणार.
 पाणीवितरण व्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत.हे प्रश्‍न मंगळवारी लेखी स्वरूपात विचारल्यास, त्यावर सभेत २० ऑक्‍टोबरला उत्तरे मिळू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT