पुणे

अहंकाराचा वारा...पेस्टिंग १७ ऑगस्ट

CD

अहंकाराचा वारा...
पेस्टिंग १७ ऑगस्ट
.......................
स्वातंत्र्य विवेकाच्या हाती
डॉ. वर्षा खोत
.......................
व्यक्तिस्वातंत्र्य मतभिन्नतेचा स्वीकार करते तर अहंकार मतभिन्नतेला अपमान समजतो. व्यक्तिस्वातंत्र्य प्रश्न विचारते, अहंकार प्रश्न विचारणाऱ्यालाच कमी लेखतो.
.......................
लहानपणी प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या अंमलाखाली असतो. आई-वडीलांच्या, शिक्षकांच्या, मित्रांच्या, अधिकारी पदांच्या, वरिष्ठांच्या असे सतत कोणाचे तरी नियमांत शिस्तीत, बंधनात जगणं सुरु असते. लहानाचे मोठे होत असताना आपण ज्या वातावरणात वाढलो त्यानुसार आपल्या मध्ये विचार घडत जातात. प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात. ती संगती सान्निध्य, सभोवताल, संस्कार यातून तयार होतात. या सगळ्यात प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व असते व स्वतंत्र विचारसरणी असते. एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव होते. शिक्षण, करिअर निवडताना, विवाह करताना, अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर स्वतंत्र मताचा किती विचार केला जातो हे आजही समाजात आपण पाहतो. आताची स्थिती थोडी मुभा असली तरीही इतरांच्या मतांचा किंवा आग्रहाचा अधिक परिणाम या गोष्टींवर दिसतो. सद्यःस्थितीत मुले स्वतंत्रपणे व्यक्त होताना दिसत असली तरीही पालकांचा अहं महत्त्वाचा असतो. आपल्या मुलाने आपण सांगू तेच ऐकायला हवे, करायला हवे. असा अट्टहास असतो.
अनुभवाच्या दृष्टीने ते अधिक सरस असले तरी मुलांच्या आवडीचा, क्षमतेचा व सद्यःपरिस्थितीचा विचार करणे अधिक श्रेयस्कर असते. अशा वेळी पालकांकडून दबाव आणला आतो. भावनिक आव्हान केले जाते. इथे पालकांचा अहंकार मुलांना स्वतःसारखे बनवण्याच्या प्रयत्न करतो. अशा पद्धतीने वागल्यास मुलांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येते. दबावाखाली निर्णय चुकू शकतात, करिअर/विवाह यशस्वी होतीलच असे नाही. कित्येकदा मानसिक विकार होतात. आयुष्यभर सल राहते. अशा दबावापेक्षा मोकळेपणाने संवाद साधून, सर्वंकष विचारांती विश्वासात घेऊन निर्णय झाले तर व्यक्तिस्वातंत्र्य आणि यश दोन्ही अबाधित राहील.
नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी म्हणून संस्थेच्या नियमानुसार काम करणे अनिवार्य असते. परंतु पदाधिकारी अहंकाराने भरलेले असतील तर दुष्परिणाम दिसू लागतात. कर्मचारी कोणत्याही पदावर काम करीत असेल तरीही त्याची स्वत:ची क्षमता, विचार वेगवेगळे असतात. त्यांच्यातील सकारात्मक बाबीचा योग्य वापर करून घेण्याऐवजी त्यांना सतत दाबून ठेवले तर त्यांचा विकास खुंटेल आणि पर्यायाने संस्थेसाठी काही विकास साधला जाणार नाही. त्यात कर्मचाऱ्याने स्वतः चे योगदान देणे महत्त्वाचे असते. अहंकार कर्मचाऱ्याचा ठिकाणी असेल तर तो सतत नियमबाह्य वागण्याचा प्रयत्न करेल, स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा चुकीचा वापर करेल. व्यक्ति-स्वातंत्र्याची मर्यादा ओळखून कार्यरत रहायला हवे. पतिपत्नीच्या नात्यांत एकमेकांवर अधिकार सांगितला जातो, हे साहजिक आहे. परंतु एकमेकांच्या विचारांचा देखील आदरपूर्वक स्वीकार केला गेला पाहिजे. माझेच खरे, ‘माझेच ऐकायला हवे’ असा अहंकार वाद निर्माण करतो.

काही गोष्टीमध्ये मनाप्रमाणे वागण्याची बोलण्याची मुभा नसेल तर त्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होते. अहंभावीपणाच्या दबावाखाली सतत राहून स्वतःची मते बनवणे ती व्यक्ती विसरून जाते. सतत जोडीदारावर अवलंबून राहते. इतरांनी फक्त मी म्हणेल तसेच वागावे यातून ते आपल्या जोडीदारावर अन्याय करीत राहतात. वैचारिक क्षमता खुंटवतात, निर्णयक्षमता संपवतात. संसारात तडजोड आवश्यक असली तरीही आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर विचारांवर घाला घातला जात नाही ना याची सावधपणे काळजी घ्यायला हवी. मर्यादेबाहेर अहंकारी वर्चस्व लादून घेणे हा देखील आपल्या आयुष्याशी केलेला धोका आहे. वैचारिक मतभेद असतील तर सामंजस्याने घेऊन सुवर्णमध्य काढता आला पाहिजे, सातत्याने अहंकाराच्या ओझ्याखाली दडपणं आणि त्याखाली दबून राहणं दोन्ही ही व्यक्तिस्वातंत्र्याला बाधक आहे.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘निर्भयपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य अवश्य आहे, पण ‘डोके उंच’ असणे आणि ‘अहंकाराने डोके वर काढणे’ यात फरक आहे.’’ व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली वाद करणे, स्वतःला मिरवत राहणे, अविवेकी गोष्टी करणे नेहमीच चुकीचे आहे. आपल्या व समाजाच्या मर्यादेत राहून निर्भयपणे व्यक्त होणं, आपल्या अधिकारासाठी शांतीच्या मार्गाने लढणं, हेच विधायक आहे. माझ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांना बाधा न करता, दुसऱ्यांचा आदर सन्मान करणे हे देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्याला अहंकाराची जोड मिळाली कि बाधा येते. स्वातंत्र्याला विवेकाची जोड असायला हवी.
मना तुझे स्वातंत्र्य विवेकाच्या हाती।
दुजाचा अधिकार जपूनी चालती॥
व्यक्तिस्वातंत्र्य मतभिन्नतेचा स्वीकार करते तर अहंकार मतभिन्नतेला अपमान समजतो. व्यक्तिस्वातंत्र्य प्रश्न विचारते, अहंकार प्रश्न विचारणाऱ्यालाच कमी लेखतो. व्यक्तिस्वातंत्र्य स्वतःचे निर्णय घेते, अहंकार आपल्या निर्णयांवर टीका सहन करत नाही. सोशल मीडियाच्या जगात व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य वाढले आहे, परंतु दुसऱ्यास अपमानित करण्याचा, बदनाम करण्याचा हा अधिकार नव्हे. या स्वातंत्र्याला जबाबदारीची सीमा असायला हवी. व्यक्तिस्वातंत्र्य असायला हवेच, परंतु ते अहंकारापासून मुक्त होऊन विवेकी, संयमी हवे.
‘मी’ विरघळता, उरे मानवता।
तेथे स्वातंत्र्याची, फुले पवित्रता।।
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! नाशिकची धुरा गिरीश महाजनांकडे; भरत गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

CSK New Coach: "आधी, MS Dhoni ची संघातील भूमिका काय ते निश्चित करा अन् मग कोच शोधा"; CSK ला दिग्गजाकडून स्पष्ट सल्ला

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

Money Horoscope: हातात पैसा अन् नशिबात राजयोग! १८ ऑगस्टनंतर राशींचे दिवस पालटणार, नशिबाची पेटी उघडणार अन् पैशांचा पाऊस पडणार!

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

SCROLL FOR NEXT