पिरंगुट, ता. ३१ : मुळशी तालुक्यातील पुणे-कोलाड या महामार्गासह अन्य प्रमुख रस्ते कचरा डेपो बनले आहेत. पिरंगुट परिसरातील बहुतांश रस्त्यांवर कचरा, राडारोडा, मलबा तसेच अन्य टाकाऊ वस्तूंचे ढीग लागलेले आहेत. यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
पिरंगुट घाट रस्त्याने पहाटे तसेच सकाळी व्यायामासाठी पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांसाठी ‘आम्ही आणि ग्रामपंचायतीने काय आता रात्रंदिवस खडा पहारा करायचा का?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, पोलिस, वनविभाग यांपैकी कोणत्याही विभागाकडून अशा कचरा टाकणाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने हे रस्ते घाणीच्या खाईत लोटले जात आहेत. कचरा व मलबा टाकणाऱ्यांवर संबंधित ग्रामपंचायतींनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
चांदणी चौकापासून भूगाव, भुकूम, पिरंगुट, कासार आंबोली, दारवली ते पौड (ता. मुळशी) येथील पुणे-कोलाड रस्त्यालगत पिरंगुट खिंड ते मुकाईवाडी मार्गे उरवडे आणि मुठा खिंड या मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य कायमच झालेले आहे.
पिरंगुट घाट रस्ता म्हणजे कचरा टाकणाऱ्यांचे हक्काचे आणि खात्रीशीर ठिकाण झालेले आहे. रात्रीच्या वेळी येथील घाट रस्त्यात कचऱ्याबरोबर आता इमारतींचा राडारोडा, मलबा तसेच अन्य वस्तूंचे ढीग लागायला सुरुवात झाली आहे.
मलबा फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
पिरंगुट घाट रस्त्यालगत मलब्याचे ढीग थेट गटारात असल्याने या ढिगामुळे गटारातून वाहणारे पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ लागले आहे. त्यामुळे मलब्यातील मातीमिश्रित गाळ व पाणी रस्त्यावर येऊन वाहने घसरून अपघात होत आहेत. परिसरात इमारतींचे बांधकाम मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तेथील मलबा थेट रस्त्यावर फेकला जात आहे. या वाहनांवर व त्यांच्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक व प्रवासी करीत आहेत.
05747
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.