पोलिओ डोसपासून एकही बालक वंचित राहणार नाही
ज्योती गाडे ः राष्ट्रीय पल्स पोलिओ डोस मोहिमेसाठी मनपा सज्ज
अहिल्यानगर, ता. २५ ः शहरातील एकही बालक पल्स पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले आहे. शेवटच्या घटकातील बालकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक कुटुंबापर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. शहरामध्ये महापालिकेचे सात आरोग्य केंद्र, तसेच २२५ पोलिओ बूथवर एकाच वेळी बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर ज्योती गाडे यांनी दिली.
राष्ट्रीय पल्स पोलिओ निर्मूलन मोहिमेअंतर्गत रविवारी (ता. २८) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी अहिल्यानगर महापालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महापौर गाडे यांनी बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर, उपायुक्त मेहेर लहारे, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर, नगरसेवक करण कराळे, डॉ. वृषाली आरू, सुनील कटारिया, राजेश परदेशी आदी उपस्थित होते. महापौर गाडे म्हणाल्या, शहरातील सर्व पालकांनी आपल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातील पाल्यांना २८ जून रोजी जवळच्या पोलिओ केंद्रावर घेऊन जाऊन पल्स पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. पोलिओमुक्त भारताच्या राष्ट्रीय अभियानात प्रत्येक पालकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर म्हणाले, राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ही बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व पोलिओ बूथचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. आशा सेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २७) विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सायकल व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, याचे नियोजन करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या बालकाला पोलिओचा डोस देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.