पुणे : दिवाळीच्या सणासुदीत मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये अन्न भेसळीची शक्यता लक्षात घेऊन अन्न प्रशासन विभागाने भेसळ रोखण्यासाठी दक्ष राहावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
सरकारी विश्रामगृहात गुरुवारी (ता. २८) आयोजित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अन्न प्रशासनचे सहआयुक्त शिवाजी देसाई, औषध प्रशासनचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त या वेळी उपस्थित होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, सणासुदीच्या कालावधीत अन्नपदार्थ, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सौंदर्य प्रसाधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी काही व्यक्ती भेसळीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करून नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्याला विभागाच्या अधिकाऱ्यांनी आळा घालावा. ही उत्पादने तयार होण्याच्या ठिकाणी अचानक छापे टाकून तपासणीसाठी नमुने घ्यावेत. भेसळयुक्त नमुने आढळून आल्यास अशा उत्पादकांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.
गूळ उत्पादकांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार काही उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी गूळ उत्पादक आणि इतर खाद्यपदार्थ उत्पादकांसोबत बैठक घेऊन उत्पादनांचा दर्जा राखण्याचे महत्त्व तसेच कायद्यातील तरतुदींची माहिती त्यांना द्यावी. अन्नभेसळीचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
राष्ट्रीय औषध किंमत नियामक प्राधिकरणाने (एनपीपीए) औषधांच्या किमतीबाबत जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने औषध प्रशासनाने राज्यभरात विशेष मोहीम हाती घेऊन औषधांच्या किमती ‘एनपीपीए’ने निश्चित केल्यापेक्षा जास्त नाहीत याची खात्री करावी. निश्चित केल्यापेक्षा जास्त किंमत असल्यास उत्पादकांविरुद्ध कारवाई करावी. नागरिकांनी कोठे तक्रार करायची याबाबत सरकारी रुग्णालये, सरकारी कार्यालये, औषधांची दुकानांच्या ठिकाणी माहिती फलक, फ्लेक्सच्या माध्यमातून माहिती पोचवावी, अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी दिल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.