पुणे

कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाण पूल

मंगेश कोळपकर

पुणे - शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर एसएनडीटी महाविद्यालय ते गरवारे महाविद्यालयादरम्यान सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामेट्रो उड्डाण पूल बांधणार असून त्याचे पैसे महापालिका देणार आहे. या पुलावरून दुतर्फा वाहतूक होऊ शकेल. त्यामुळे नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. दुमजली पुलासारखी ही रचना राहणार असून पहिला पूल हा वाहनांसाठी, तर त्याच्या डोक्‍यावरील पूल मेट्रोसाठी असेल.

कर्वे रस्त्यावरून वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक होते. नळस्टॉप चौकात पाच प्रमुख रस्ते एकत्र येतात. त्यामुळे या चौकात वारंवार वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अनेक प्रयोग केले. परंतु, त्यात यश आले नव्हते. एसएनडीटी महाविद्यालयापासून गरवारे महाविद्यालयापर्यंत उड्डाण पूल उभारल्यास दशभुजा गणपती चौकातून वाहनचालकांना थेट डेक्कनपर्यंत जाता येईल. या रस्त्यावर चार चौक ओलांडून उड्डाण पूल जाणार आहे. कोथरूडमधील लोकप्रतिनिधी या उड्डाण पुलासाठी आग्रही होते. परंतु, याच रस्त्यावरून वनाज-रामवाडी मार्गावरील इलेव्हेटेड मेट्रो जाणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या कामाला गती आली नव्हती. मात्र, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजित उड्डाण पुलासाठी पाच कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांत नुकत्याच झालेल्या चर्चेत उड्डाणपुलाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. आता या बाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुलासाठी सध्या पाच कोटी रुपयांची तरतूद असली, तरी पुलाचा नेमका खर्च निश्‍चित झाल्यावर किमान निम्म्या रकमेची तरतूद प्राधान्याने करण्यात येईल. हा पूल साकारल्यास कोथरूड, कर्वेनगर परिसरातील वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या पुलाचा वेगाने पाठपुरावा करण्यात येईल.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती

कर्वे रस्त्यावर मेट्रो मार्गाखाली उड्डाण पूल उभारण्याबाबत महापालिकेबरोबर चर्चा झाली आहे. उड्डाण पुलामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्यामुळे महापालिकेने नेमका आराखडा सादर केल्यावर वनाज-रामवाडी मेट्रोच्या मार्गाबरोबरच या पुलाचेही काम सुरू होऊ शकते. 
- ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

कर्वे रस्त्यावर उड्डाण पुलाचा विचार करताना कोंडी अन्य ठिकाणी होणार नाही ना, याचा विचार केला पाहिजे. तसेच पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडण्यासाठी पुरेशी सुविधा निर्माण केली पाहिजे. दीर्घ कालावधीतही उड्डाण पूल उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने रचना व्हायला हवी. 
- राजेंद्र शिधये, सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट

१२५ सेकंदांत ७५० वाहने  
आठवले चौकातून गर्दीच्या वेळेत पौड रस्ता आणि खंडुजी बाबा चौकाकडे (डेक्कन) नेमकी किती वाहने जातात, याचा वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता आढावा घेतला. त्या वेळी सिग्नलच्या १२५ सेकंदाच्या एका ‘सायकल’मध्ये सुमारे ७५० वाहने थांबत असल्याचे त्यांना दिसून आले. त्या वाहनांची संख्या त्यांनी प्रत्यक्ष मोजून ‘सकाळ’ला त्याची माहिती दिली.

मिनिटाला ४०० वाहने 
नळ स्टॉप चौकात एका मिनिटाला सरासरी सुमारे ४०० हून अधिक वाहनांची ये-जा होते. सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात या गर्दीच्या वेळेत एका मिनिटाला सुमारे ६०० हून अधिक वाहने जातात. या रस्त्यावरून तासात ३२ हजार वाहने जातात. त्यामुळे येथे उड्डाण पूल उभारायला हवा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT