पुणे

मनाचे ऐका... मेंदूचे नाही

सुनंदन लेले

पुणे - पुणे आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ने स्कूलिंपिक्‍सच्या माध्यमातून उभ्या केलेल्या खेळाच्या भव्य व्यासपीठावर बुधवारी नवचैतन्याचे वारे वाहिले. ज्या दिवशी जागतिक क्रिकेटच्या नकाशावर एका बालकाने पदार्पण केले त्याच दिवसाचे औचित्य साधून त्या बालकाने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘वेब कॉन्फरन्स’द्वारे संवाद साधला. आपल्या देदीप्यमान कामगिरीने क्रिकेटमध्ये अढळपद निर्माण करणारा तो दुसरा तिसरा कुणी नाही, तर तो होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. 

सचिनच्या या पदार्पणाचा हा दिवस ‘वर्ल्ड क्रिकेट डे’ म्हणून साजरा करताना ‘सकाळ’ने सचिन तेंडुलकरला मुलांशी संवाद साधायची विनंती केली. जगभरातील मुलांना आणि क्रिकेटप्रेमींना सचिनचे विचार ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून ऐकता आले. पुण्यातील बिशप्स शाळेच्या १५० मुलांनी ते नुसते अनुभवले नाही, तर त्याच्याशी संवाद साधण्याचे भाग्यही त्यांना लाभले. या मुलांच्या प्रश्‍नांना सचिननेही उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली.

दुपारी १ वाजून १० मिनिटांनी चालू झालेल्या या संवादात सुरवातीला मुलांना सचिनच्या दर्जेदार खेळ्यांची क्‍लिप दाखविली गेली. त्या खेळ्यांमागच्या कथा सांगण्यात आल्या. ठरल्याप्रमाणे बरोबर दुपारी १.३० वाजता सचिन तेंडुलकर ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे मुलांशी संवाद साधू लागला. सचिनने त्याच्या पदार्पणाची कहाणी इतिहासात डोकावून सांगितली. स्वप्नांचा पाठलाग करताना कसे कष्ट केले आणि अडथळे कसे पार केले, हे उदाहरणे देत सांगितले. 

बिशप्स शाळेच्या क्रिकेट संघातून खेळणाऱ्या लहानग्या रोनक पारेखने सचिनला, ‘त्या पदार्पणाच्या दौऱ्यादरम्यान नाकावर चेंडू लागल्यावरही हिंमत कशी राखलीस,’ असा प्रश्‍न विचारला. या प्रश्‍नाचे उत्तर देताना नकळत भूतकाळात रमलेला सचिन म्हणाला, ‘‘होय, माझ्या नाकावर जोरदार चेंडू आदळला आणि रक्त यायला लागले. पण माझा निग्रह होता, की काहीही झाले तरी विकेट सोडायची नाही. जणू काही जास्त काही लागलेच नाही, असे भासवत मी खेळायचा विचार पक्का केला. मला चेंडू लागला तेव्हा भारतीय संघाची अवस्था थोडी नाजूक होती. मला सामन्याची सूत्रे पाकिस्तानच्या हाती द्यायची नव्हती. तो कसोटी सामना कष्ट करून आम्ही अनिर्णित राखल्याने मालिका बरोबरीत सोडवण्यात यश आले.’’

बिशप्स शाळेतील दुसरा मुलगा करण अधिकारी काहीसा निराश झाला होता कारण त्याला भारतात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेकरिता १७ वर्षांखालच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. सचिनने त्याची निराशा अगदी सहजतेने दूर केली. सचिन म्हणाला, ‘‘करण अडथळे खेळाडूच्या जीवनात येतातच. त्याने घाबरायचे नसते. खेळाडूच्या कारकिर्दीत मनासारखे नेहमी घडत नाही. कित्येक वेळा कष्ट करूनही अपेक्षित यश लाभत नाही. अशा वेळी मनाचे ऐकायचे... मेंदूचे नाही. मी इतकेच सांगेन की, सराव आणि तयारीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचे. आपण बऱ्याच वेळा निकालांवर फार विचार करतो ज्याचा परिणाम सरावावर आणि तयारीवर होतो. भरपूर मेहनत करून तुम्ही शरीराने मजबूत झालात की, मन आपोआप खंबीर व्हायला मदत होते. करण मला शब्द दे की उद्यापासून तू नव्या जोमाने सरावाला लागशील.’’ 

कार्यक्रमाचा शेवट सर्व मुलांनी तसेच शिक्षकांनी सचिनचा मुखवटा चेहऱ्यासमोर धरून केला. एका वेळी सगळे ‘सचिन’ दिसू लागल्यावर सचिन तेंडुलकरला मनापासून हसायला आले आणि १५ नोव्हेंबरच्या ‘वर्ल्ड क्रिकेट डे’चा कार्यक्रम दिमाखात पार पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT