पुणे, ता. ५ : शहरासह उपनगरांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. बुधवारी सकाळी उपनगरातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा शिडकावा झाला.
मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे पावसाचा जोर ओसरल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मध्यवर्ती भागांसह आसपासच्या परिसरात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या दोन दिवसांत शहरात काहीकाळ ऊन पडले होते. सकाळी आलेल्या हलक्या सरींनी वाहनधारकांची काहीशी तारांबळ उडाली होती. मात्र, या शिडकाव्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. यानंतर सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी चारच्या सुमारासही अचानक हजेरी लावली. अवघ्या पाच ते १० मिनिटांच्या जोरदार सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. वाहनचालकांनी मिळेल त्या ठिकाणी आश्रय घेतल्याने काही चौकांमध्ये वाहतूक काहीशी मंदावली होती.
दरम्यान, बुधवारी शिवाजीनगर येथे तीन, एनडीए येथे सात, पाषाण परिसरात सहा, चिंचवड येथे चार, तर कोरेगाव पार्क, लोहगाव आणि हडपसर परिसरात दोन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरासह उपनगरांमध्ये हवामान ढगाळ राहील. स्थानिक पातळीवर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच गुरुवारी घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. तर सात ऑगस्ट रोजी घाट विभागाला ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.