पावसाच्या विश्रांतीमुळे शेतीकामांना वेग
--
फवारणी, तणनियंत्रण, केळी काढणीला गती
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील कामांना वेग आला आहे. बहुतांश भागात हलके ढगाळ वातावरण आणि सूर्यदर्शन होत असल्याने फवारणी, तणनियंत्रण, काढणी आणि मळणीची कामे पुन्हा सुरू झाली आहेत. मात्र अनेक भागांत पावसाचे सातत्य नसल्याने शेतकरी पुढील पावसाकडेही लक्ष ठेवून आहेत.
सध्या कमाल तापमान सुमारे ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असून उष्णता आणि उकाडा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळच्या थंड वातावरणातच शेतीकामांना सुरुवात करत आहेत.
मागील काही दिवस सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे कापूस वेचणी, फवारणी, तणनियंत्रण, काढणी आणि मळणीची कामे ठप्प झाली होती. मात्र आता पावसाने उसंत दिल्याने हलक्या व मध्यम जमिनीतील शेतांमध्ये कमी वाफशातही फवारणी आणि तणनियंत्रणाची कामे सुरू झाली आहेत.
दीर्घकाळ प्रतिकूल हवामानामुळे शेतमजुरांनाही काम मिळत नव्हते. आता एकाच वेळी विविध शेतीकामे सुरू झाल्याने अनेक भागांत मजुरांची मागणी वाढली असून मजूरटंचाई जाणवू लागली आहे.
--
चौकट
केळी काढणीला वेग
पावसाची तीव्रता कमी झाल्याने केळी काढणीच्या कामालाही गती मिळाली आहे. यापूर्वी मुख्य रस्त्यालगतच्या बागांमधूनच केळीची वाहतूक होत होती. आता शिवारातील रस्तेही काही प्रमाणात सुरळीत झाल्याने जळगाव, चोपडा तसेच पाचोरा-भडगाव परिसरातील बागांमध्ये ट्रक आणि मोठी वाहने पोहोचू लागली आहेत. भाजीपाला पिकांमध्येही तणनियंत्रण आणि खत व्यवस्थापनाची कामे सुरू झाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.