पुणे - पाणी कपातीच्या उंबरठ्यावर असलेल्या पुणेकरांना शुक्रवारी दिवसभर झालेल्या संततधार पावसाने दिलासा दिला. माउली आणि तुकोबांच्या पालख्यांनी पुण्याचा निरोप घेताच पावसाच्या सरींनी जोर धरला. संध्याकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यात २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पंढरीच्या वाटेवर असलेल्या दोन्ही पालख्या पुण्यनगरीचा निरोप घेत असताना पावसाला सुरवात झाली. पुण्यात पालखीचा मुक्काम असताना दमदार पावसाने हजेरी लावली होती. पावसाने वारकरीही आनंदले. ‘पांडुरंगच पावला’, अशी बोलकी प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली.
शहराच्या काही भागांत वेगवेगळ्या दिवशी एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा उपाय महापालिका महिन्याभरापासून राबवत आहे. त्यामुळे शहर पाणी कपातीच्या उंबरठ्यावर असल्याने प्रत्येक पुणेकराचे लक्ष पावसाकडे लागले होते. जूनची दहा तारीख झाल्यानंतर मॉन्सूनच्या दमदार पावसाची पुणेकर वाट पाहत होते. या जोरदार पावसाला गुरुवारपासून सुरवात झाली. गुरुवारी ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर दुसऱ्या दिवशी सकाळपासून संततधार पाऊस पडत होता. दुपारी अडीच वाजेपर्यंत २१.६ मिलिमीटर पाऊस पडला.
जूनची सरासरी ओलांडली
शहरात २८ जूनपर्यंत सरासरी १२५ मिलिमीटर पाऊस पडतो. २६ जूनपर्यंत ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने पुण्यातील २८ जूनपर्यंतच्या पावसाची सरासरी ओलांडली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. पुण्यात जूनमध्ये १३४.३ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. सरासरीपेक्षा ९.३ मिलिमीटरने हा पाऊस जास्त असल्याचेही सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.