पुणे

रॅम्से कोणाला फसवतातय

CD

विश्वाचे आर्त - डॉ. सदानंद मोरे

रॅम्से कोणाला फसवतात?

लीड
सन १९१३मधील भारतासारख्या ब्रिटिश वसाहतीत इंग्रजी साहित्याच्या वगैरे आधारे लोकांचे समाधान करून त्यांना इंग्लंडच्या ‘Union’मध्ये ठेवता आले असते का, हा प्रश्न रॅम्से विचारीतच नाहीत. ते कोणाला फसवतात? वसाहतींना, इंग्लंडला की स्वतःला?
००००००

सर डब्ल्यू. एम. रॅम्से हे नाव तसे सुपरिचित किंवा सर्वपरिचित असायची शक्यता नाही. कारणही नाही. हे गृहस्थ अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील ख्रिस्ती धर्माचे तसेच रोमन इतिहासाचे मोठे अभ्यासक होते. त्या अभ्यास क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा आपल्या कक्षेत येत नाही. तथापि, विल्यम पेनच्या पेनसिल्व्हेनियामधील शांतीच्या पवित्र प्रयोगाची आणि नंतर त्याने सादर केलेल्या युरोपियन शांतीप्रस्तावाची (ज्यात वैश्विक होण्याची क्षमता होती) चर्चा करताना रॅम्सेचा संदर्भ घेणे उचित वाटते.
सन १९१३च्या मे महिन्यातील ८ तारखेला रॅम्सेने ‘The Imperial Peace : An Ideal in European History’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानानंतर वर्ष लोटतेय न लोटतेय तोच, म्हणजे २८ जुलै १९१४ या दिवशी पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. त्याच्या तपशिलात जायची गरज नाही. तथापि, एका गोष्टीची नोंद घेणे मात्र आवश्यक वाटते. आपल्या या व्याख्यानात रॅम्सेने त्याची शक्यता वर्तवली होती. तो म्हणतो, ‘It is indeed true that Eruope is now divided so to say, into a small number of fortified camps and armies ready for war, or nearly ready.’
रॅम्से एवढेच सांगून थांबला नाही. त्याने या संभाव्य युद्धाचे स्वरूप कसे असेल याविषयीही भाकित केले. हे युद्ध यापूर्वीच्या सर्व युद्धांपेक्षा अगदी वेगळे असेल. कसे? तर, ‘The war is now waged with the entire strength and the whole manhood and the collected resources of a nation.’
अर्थात, अशा प्रकारच्या संभाव्य युद्धावरील संभाव्य उताराही रॅम्सेकडे आहे. तो त्याला महाकवी दान्तेच्या काव्यात सापडला. दान्तेच्या यासंबंधीच्या विचारांची काहीएक चर्चा आपण केलेली आहे. तिची पुनरावृत्ती नको. वैश्विक साम्राज्य किंवा विश्वराज्य (Universal Empire) हा तो उपाय होय. अशा साम्राज्याचा सम्राट अर्थातच व्यक्तिगत किंवा केवळ स्वराष्ट्राच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहणारा असेल हे सांगायची गरज नाही. तो विश्वसम्राट असल्यामुळे त्याची कोणाशी स्पर्धा नसेल म्हणजेच त्याला प्रतिस्पर्धी नसेल. त्याला कोणावर मात करायची गरज नसणार. त्याने कोणाचा मत्सर वा द्वेष करण्याच्या प्रश्नच उद्‍भवणार नाही. सर्व जगाचे हित हेच त्याचे उद्दिष्ट असणार आणि त्याला धरूनच त्याचा राजकारभार. पूर्ण शांती हे त्याच्या राज्याचे वैशिष्ट्यच असेल. राज्यात न्याय आणि स्वातंत्र्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. कारण या दोन गोष्टी तर शांतीच्या अटी आहेत. असे म्हणा किंवा त्या तेव्हाच शक्य होतील जेव्हा राज्यात शांती नांदत असेल असे म्हणा. मानवाचा स्वभाव व क्षमता शांतीच्या वातावरणातच उमलतील व फुलतील.
मुळात दान्तेची ही मांडणी ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाने प्रभावीत होती. दान्तेचा काळ हा एकीकडे ख्रिस्ती धर्म आणि दुसरीकडे ॲरिस्टॉटल यांचा सर्वच क्षेत्रांत मेळ घालायचा काळ होता. त्याला राजकीय क्षेत्र कसे अपवाद राहील? दान्तेचा हा विश्वचक्रवर्ती आंतरराष्ट्रीय कायदे करू शकणारा - त्यांचे उगमस्थान किंवा स्रोत असेल व त्याचा रक्षणकर्ताही असेल.
अर्थात, उपरोक्त दोन विचारांच्या राजकीय क्षेत्रात मेळ घालताना दान्तेपुढील आदर्श रोमन साम्राज्याचा होता. ते जणू काही एक प्रारूप (Model) होते. या रोमन साम्राज्याचे प्रतिबिंब त्याला महाकवी व्हर्जिल याच्या काव्यात सापडले आणि प्रत्यक्ष जितेजागते उदाहरण रोमन सम्राट शार्लमेनमध्ये गवसले. रॅम्सेच्या म्हणण्याप्रमाणे या सम्राटाचे उद्दिष्ट ‘To make his Empire a moral community, one vast Christian city. This it was which completed his glory. The glory springs indeed from his power, for men always admire these who have given orders to multitudes of men; but his power is embellished by the grandeur of Caralingian ideal, the moral union of humanity in the Imperium Christianum.’
रॅम्सेने महत्त्वाची तथ्ये सांगितली आहेत. मात्र एक उणीव जाणवते ती म्हणजे एक विशिष्ट धर्माच्या (ख्रिस्ती धर्माच्या) चौकटीतच म्हणजेच मर्यादेतच ही मांडणी झाली आहे. याचा अर्थ असा होतो, की जोपर्यंत जगातील सर्व राष्ट्रे ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करीत नाहीत, तोपर्यंत असे शांतीचे साम्राज्य स्थापन होणे दुरापास्तच म्हणायचे! दरम्यानच्या काळात वाहून गेलेल्या पाण्यात कॅथलिक आणि प्रोटेस्टंट राष्ट्रांमधील दीर्घकाळ चाललेल्या युद्धाचा समावेश होतो तेव्हा ही बाब धर्माच्या चौकटीत मावणारी नसल्याचे लक्षात येते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणखी वर्षभराच्याच अंतरावर पहिले महायुद्ध वाट पाहत उभे होते, हे ख्रिस्ती राष्ट्रे कशी एकमेकांच्या उरावर बसतात हे पाहण्यासाठी!
बाकीच्या बाबी राहू द्या. या पंथीय मर्यादा ओलांडण्याची क्षमता दस्तुरखुद्द रॅम्सेसाहेबांच्या अंगी तरी होती काय? तो स्वतः ख्रिस्ती धर्माचा, धर्मग्रंथांचा अभ्यासक असला, तरी त्याने क्वेकर पंथाला समभावाने वागवले असे म्हणता येत नाही. अन्यथा एवढ्या महत्त्वाच्या लेखात निदान विल्यम पेनचे नाव व कामगिरी कोठेतरी डोकवायला हवी होती.
ते जाऊ द्या, रोमन आणि दान्ते युगातून थेट वर्तमानात येताना झालेला बदल विचारात घेऊन रॅम्से लिहितो, ‘Modern society, while passing into a new stage of growth acknowledge and accepts as fundamental all the essential part of Dante’s doctrine, An ordered peace, a peace that enforcer progress through justice and freedoms is to us as to Dante, The end and aim of mankind. We are faced by the same problem. How shall there be constructed a supreme order able to enforce that universal freedom and justice combined which constitue the active power of peace?’
दान्तेच्या काळात जशी अनेक स्पर्धिष्णू राष्ट्रे अस्तित्वात होती तशीच आताही आहेत याची नोंद घेऊन रॅम्से विचारतो, ‘Dante’s dream was that the supreme monarch was a power equal to the requirements. What shall we say about the future in Europe?’
मुद्दा असा दिसतो, की असा एखादा सम्राट किंवा समर्थ राष्ट्र आजच्या जमान्यात शक्य आहे का, की ज्याच्यामुळे, ज्याच्या सामर्थ्यामुळे शांती प्रस्थापित होऊन राष्ट्रा-राष्ट्रांमधील कलह थांबेल व न्याय आणि स्वातंत्र्य यांची प्रस्थापना होईल? पण मग आधुनिक काळात वाढीस लागलेल्या ‘National Individualities’चे काय करायचे? त्यातील एखाद्या दुसरीला इतरांवर मात करीत साम्राज्यप्राय सामर्थ्यशील होऊ देणे उचित ठरेल काय? बलशाली साम्राज्य इतर राष्ट्रांवर जुलूम, अन्याय करणार नाही कशावरून, त्यांचे शोषण करणार नाही कशावरून?
रॅम्से येथे एकदम वेगळे मत मांडतो - ‘For my part I should refuse to regard as evil as power which has been steadily growing through modern history. It is a great power, which may be turned (like every vast power) to evil or good purposes, but to condemn it as evil is to declare that the tide of European development has been for a long time setting steadily towards evil.’
याचा अर्थ असा होतो, की अशा प्रकारे एकमेकांशी स्पर्धा करीत बलिष्ट होण्यात रॅम्सेला काही अडचण वाटत नाही. कारण ‘The peace which is really good is a positive power, the force of order, not a mere negative condition. It is the orderly balance of active and powerful forces.’
हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे वेगळ्या प्रकारे का होईना रॅम्से हेन्री किसिंजरच्या सत्तासमतोलाच्या राजकीय वास्तववादी विचारांशी जवळीक साधताना दिसतो.
थोडक्यात काय, की दान्तेला अभिप्रेत असलेल्या शांतिदूत समर्थ सम्राटाचे आगमन आता कोणालाच नको आहे. ‘The modern ideal is the voluntary acceptance of by the separate nationalities of the course of action which is conducive to the good of all.’ याचा अर्थ असा होतो, की रॅम्से दान्तेच्या बलिष्ठ सर्वसामर्थ्यवान सम्राटाच्या ऐवजी सर्वमान्य तत्त्वाची प्रस्थापना करू पाहतो?
होय कारण ‘There is no longer any question of a common government or of unifying the diverse nationalities in one European on world wide state. The nations are and remain separate.’
हा एक प्रकारचा वास्तववादच म्हणावा लागतो. राष्ट्र-राज्ये अस्तित्वात आहेत आणि राहणार त्यांच्यापैकी कोणालाही साम्राज्य होता येणार नाही ही जाणीव वास्तववादीच म्हणावी लागेल.
पण रॅम्सेचा वास्तववाद केवळ वरवरचा आहे. खरे तर १९१३ साल म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचा शिखराध्याय होता. दुसरीकडे जर्मनीचा प्रयत्न त्याची जागा घेण्याचा होता, तर रशियाबद्दल नेमके विधान करणे अवघड होते. तुर्क किंवा फ्रेंच साम्राज्ये इंग्लंडच्या तुलनेत मागेच पडणारी होती. तिकडे अमेरिकेचे वाढते सामर्थ्य सर्वांनाच दिसून येत होते; पण तो देश काही साम्राज्य (म्हणजे इतर राष्ट्रांवर राज्य करणारा) नव्हता. शिवाय त्याची युद्धक्षमता अद्याप पुरेशी कसाला लागलेली नव्हती.
रॅम्सेने खरेतर ताकाला जाऊन भांडे लपवायचा प्रयत्न केलेला दिसतो. तो स्वतः इंग्लंडचा नागरिक होता. त्याचे हे नागरिकत्व ऐन मोक्याच्या क्षणी उफाळून वर आलेले दिसते. त्याच्याच भाषेतील म्हण वापरून मुद्दा स्पष्ट करायचा झाल्यास ‘The cat has come out of the bag’. कशी ते पाहा.
समारोपाच्या निवेदनात रॅम्से त्याच्याकडे म्हणजे ऑक्स्फर्ड विद्यापीठात आलेल्या एका रोमन प्राध्यापकाशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करतो. हे ‘व्हिजिटिंग’ विद्वान रोमच्या इतिहासाच्याच आधारे म्हणजेच स्वानुभवातून सांगू लागले, की वसाहतवादी साम्राज्ये कायमची टिकत नसतात, शाश्वत नसतात. ‘The empire had in it the inevitable seeds of dissolution which were rapidly maturing to their indivitable result. The colonies have nothing to gain from the union with England; the interests of the colonies were opposed to and inconsistant with the interests of Britain and they must go in the direction that was advantages for themselves.’
या मुद्द्यावर रॅम्से गोंधळलेले दिसतात. ‘What may be for material and immediate advantage of the colonies I cannot pretend to know or guess.’
आता एखाद्या वसाहतीसाठी तिच्या ताबडतोबीच्या भौतिक रोकड्या लाभाचा मुद्दा काय असतो हे त्याच्यासारख्या विद्वानाला समजत नसेल यावर कोण विश्वास ठेवेल? पण त्याकडे दुर्लक्ष करून ते चर्चा भलतीकडे नेतात. त्यांना हेही मान्य करावे लागते, की It is now generally recognised that the Union of Empire rests on sentiment and not on calculation of apparent material interest. It rests on the possesion of common ideals of liberty and free individual development on historical memories and on English literature.’
व्याख्यानाच्या सुरुवातीलाच त्यांनी ऐतिहासिक काळातील इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील वादाचा, संघर्षाचा, ऐक्यप्रयत्नाचा उल्लेख का केला असावा हे आता लक्षात येते. अनेक बाबतीत भिन्नता असूनही त्यावर सर वॉल्टर स्कॉट यांच्या साहित्याने मात करता आली व त्यांची ‘Union’ होऊ शकली याचा त्यांनी उल्लेख केला आहे.
सन १९१३मधील भारतासारख्या ब्रिटिश वसाहतीत इंग्रजी साहित्याच्या वगैरे आधारे लोकांचे समाधान करून त्यांना इंग्लंडच्या ‘Union’मध्ये ठेवता आले असते का, हा प्रश्न रॅम्से विचारीतच नाहीत.
ते कोणाला फसवतात? वसाहतींना, इंग्लंडला की स्वतःला?
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Sanjeev Arora ED Action: पंजाबचे कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांना अटक, ईडीचे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात छापे

Shaktipeeth Highway Land Acquisition : शक्तिपीठ महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया; राज्य सरकारकडून अंतर्गत हालचालींना वेग

अवधूत गुप्तेंच्या आवाजातील 'तुंबाडची मंजुळा'मधील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! सोशल मीडियावर होतेय चर्चा

साखळी बॉम्बस्फोटामागंच मोठं सत्य उलगडणार, 'मिशन’ च्या ट्रेलरमधून मोठी हिंट समोर

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT