कळंभे मुक्कामी एसटी सुरू करा
ग्रामस्थांची मागणी; वाई आगार व्यवस्थापकांना निवेदन
आनेवाडी, ता. २१ ः वाई तालुक्यातील कळंभे गावातील एसटी बसचा मुक्काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात कळंभे ग्रामस्थांच्या वतीने माजी उपसरपंच हणमंतराव गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन वाई आगार व्यवस्थापक युवराज कदम यांना देऊन एसटी सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कळंभे गावातून धावणाऱ्या एसटी बसची सेवा विस्कळित झाली असून, गावात येणारी मुक्कामी बस बंद करण्यात आली आहे. यामुळे शाळकरी मुले, पालक, तसेच वयोवृद्ध ग्रामस्थ यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा थेट परिणाम होत असून, काही पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांची शाळा बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, परिस्थिती गंभीर बनली आहे.
ग्रामस्थांच्या मते, बसची वेळ शाळांच्या वेळापत्रकाशी सुसंगत ठेवून आवश्यक त्या अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्यास या मार्गावरील प्रवासी संख्या आणि उत्पन्नातही वाढ होऊ शकते. प्रशासनाने याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. वेळेवर शाळा व परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत कळंभे गावातील एसटी मुक्काम पुन्हा सुरू करून अतिरिक्त फेऱ्या चालू कराव्यात, अशी ठाम मागणी श्री. गायकवाड व ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी यशवंत शिवथरे, डॉ. रणजित गायकवाड, अनिल शिवथरे व मदन वाघ हे निवेदन देताना उपस्थित होते.
वाई ः युवराज कदम यांना निवेदन देताना हणमंत गायकवाड व ग्रामस्थ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.