लोणी काळभोर, ता. १५ : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी फाटा पुलावर वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या रिक्षाचालकाने पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी स्वतःच्याच डोक्यात दगड मारून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी घडली. जखमी अवस्थेतच चालक रिक्षासह पसार झाला असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी योगेश रामभाऊ काकडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षाचालक शंकर मनोहर खंडागळे (वय ५०, रा. कदमवाकवस्ती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर येथील आठवडा बाजारामुळे लोणी फाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ती सुरळीत करण्यासाठी योगेश काकडे तेथे तैनात होते.
रात्री सव्वाआठच्या सुमारास पुलावर एमएच १२ एक्सएन-५३९७ क्रमांकाची रिक्षा उभी करून चालक प्रवासी भरत असल्याचे काकडे यांच्या निदर्शनास आले. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काकडे यांनी रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेऊन कारवाईसाठी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. मात्र, कारवाईच्या भीतीने खंडागळे याने स्वतःच्या डोक्यात दगड मारून घेतला आणि पोलिसांना गुंगारा देत रिक्षासह घटनास्थळावरून पसार झाला. महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.