वडगाव मावळ, ता. २८ : मावळ तालुक्याच्या माजी आमदार रूपलेखा खंडेराव तथा दादासाहेब ढोरे (वय ७६) यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. त्या मावळ तालुक्यातील पहिल्या महिला आमदार होत्या.
मंगळवारी हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर त्यांना सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मावळ पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती दादासाहेब ढोरे यांच्या त्या पत्नी, भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष मनोज तथा भाऊसाहेब ढोरे व उद्योजक सचिन ढोरे यांच्या मातुःश्री, तर माजी सरपंच बाळासाहेब ढोरे यांच्या चुलती होत. रूपलेखा ढोरे यांनी १९९२ मध्ये तत्कालीन वडगाव-इंदोरी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला. त्याच वेळी पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजपचे समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून उपसभापतिपदाची निवडणूक झाली होती. यात त्यांच्या बाजूने कौल लागला. त्यांनी उपसभापतिपद तीन वर्षे भूषविले होते. भाजपने १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचा पराभव करून मावळच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. तेव्हा राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेत आली. या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून तालुक्यात ५५ नळ पाणी पुरवठा योजनांची कामे करीत त्यांनी तालुका टँकरमुक्त केला. मंगरूळ येथील आंद्रा धरणाच्या कामही त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल-ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीचे चेअरमनपद त्यांनी भूषविले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सल्लागार मंडळावर त्या कार्यरत होत्या. नंतरच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या राजकीय जीवनात फारशा सक्रिय नव्हत्या. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मात्र त्या उपस्थित राहात असत. पवनानगर येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नुकत्याच झालेल्या प्रचारसभेला त्या उपस्थित होत्या.
भाजप, राष्ट्रवादीतर्फे श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातातील मृत्यू व रूपलेखा ढोरे यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली. व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. वडगावमधील भाजप कार्यालयात अजित पवार व रूपलेखा ढोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, अविनाश बवरे, माऊली शिंदे, बाबूराव वायकर, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, सुभाष जाधव, अभिमन्यू शिंदे, सायली बोत्रे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोकसभेत शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, नगरसेवक पंढरीनाथ ढोरे, अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, नगरसेविका पूनम भोसले, सुनीता ढोरे, आकांक्षा वाघवले, भाऊसाहेब ढोरे आदी उपस्थित होते. दोन्ही नेत्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.