AKK26B06330
सोलापूर ः अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याचे धमकी देण्यात आल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट भाजपच्यावतीने पोलिस आयुक्तांना निवेदन देताना भाजप अक्कलकोट मंडळाचे अध्यक्ष प्रदीप पाटील व अन्य.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सुरक्षा वाढवा
भाजपचे विकास वाघमारे यांची मागणी; कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ ः अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हत्येचा कट रचून सुपारी दिल्याची घटना उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केली. याबाबत त्यांनी मंगळवारी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे पत्र दिले. तर कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घालत निवेदन दिले.
आमदार कल्याणशेट्टी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे लोकप्रतिनिधी असून, दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी त्यांच्या संपर्कात येतात. तसेच सार्वजनिक कार्यक्रम व बैठकांसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो. अशातच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना गंभीर असून, त्यांच्या जीविताला धोका असल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. ही केवळ धमकी नसून, यामागे एखादी मोठी शक्ती कार्यरत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. तर भाजपचे अक्कलकोट उत्तर मंडलचे अध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
७ ऑगस्ट रोजी आमदारांचे कुटुंबीय सोलापूर शहरात आले असताना मक्तादार चौक परिसरात दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी वाहनचालकासमोर आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. आमदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन अतिरिक्त पोलिस सुरक्षा द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी विनायक सुतार, संभाजी दडे, सुदर्शन यादव, अविनाश सिरसट आदी उपस्थित होते.
अक्कलकोट भाजपचे पोलिस आयुक्तांना निवेदन
अक्कलकोट शहर ः आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी त्यांच्याच वाहनाच्या चालकासमोर देऊन त्यासाठी पैशाचे आमिष देणाऱ्या दोन गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीवर व त्यांच्या मागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच आ.कल्याणशेट्टी व त्यांच्या कुटुंबीयाना संरक्षण द्यावे अशी मागणी भाजपचे अक्कलकोट मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना निवेदन देऊन केली. याप्रसंगी मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, सुनील खेड, अमोल हिप्परगी, महादेव पाटील, नगराध्यक्ष अंजली बाजारमठ, पनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, युवामोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार, यशवंत धोंगडे, रामप्पा चिवडशेट्टी, महेश हिंडोळे, महेश इंगळे, शिवशरण जोजन, प्रविण शहा आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.