शिरूर, ता. २१ : पी. आर. धारिवाल फाऊंडेशनच्या वतीने, मंगळवार (ता. २४) ते सोमवार (ता. २) या कालावधीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी रामलिंग रस्ता परीसरातील जाधव मळा येथे २५ एकर जागेवर भव्य मंडपाची उभारणी केली आहे. शहर आणि पंचक्रोशीत सर्वत्र स्वागत कमानी, धर्मध्वज, धार्मिक फलक उभारण्यात आल्याने शहर आणि परिसरातील वातावरण ‘शिवमय’ झाले आहे.
शिवपुराण कथासोहळ्यात पंडित मिश्रा दररोज दुपारी एक ते चार या वेळेत कथेच्या माध्यमातून शिवमहिमा या विषयावर विवेचन करणार आहेत. शिवमहापुराणातील दिव्य प्रसंग, शिवतत्वज्ञान, भक्तिमार्ग आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी कथांचा लाभ भाविकांना या सोहळ्यातून घेता येणार आहे. पी. आर. धारिवाल फाऊंडेशनच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले असून, जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी रामलिंग रस्ता परिसरात शामियाना उभारण्यात आला असून, सर्वत्र भगवे ध्वज, पताका, स्वागत कमानी उभारून वातावरण सुशोभित केले आहे. उद्योगपती प्रकाश धारिवाल, युवा नेते आदित्य धारिवाल, माजी नगरसेवक विजय दुगड यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची आढावा बैठक झाली. मंडप उभारणी, ध्वनिव्यवस्था, प्रकाशव्यवस्था, वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, पोलिस निरीक्षक संदेश केंजळे आदी उपस्थित होते. दरम्यान, दिना प्रकाश धारिवाल यांच्या उपस्थितीत विविध संस्था-संघटनांच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शिरूर शहरात झाली. त्यावेळी अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीने या सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शविली. प्रकाश धारिवाल म्हणाले, ‘‘माझे वडील दिवंगत रसिकलाल धारिवाल हे रामलिंग भक्त होते. दोन मार्च रोजी त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच या भक्तीसोहळ्याचे आयोजन केले असून, शहर आणि परिसरातील भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.