सिंहगड रस्ता, ता. ५ : सिंहगड रस्त्यावरील नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सततचा पाऊस, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमणे, वाहनचालकांचा बेशिस्तपणा आणि वाहतूक पोलिसांची अपुरी उपस्थिती यामुळे ही समस्या गंभीर झाली आहे. प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
नव्याने झालेल्या उड्डाणपुलामुळे आनंदनगर येथील भा. द. खेर चौक आणि माणिकबाग येथील आप्पासाहेब मोरे चौकातील कोंडी काही प्रमाणात कमी झाली असली, तरी पुलाच्या दोन्ही टोकांवरील समस्या वाढली आहे. विश्रांतीनगर येथील प्रकाश इनामदार चौकात आनंदविहार, तुकाईनगर, महादेवनगर, समर्थनगर आणि सिंहगड महाविद्यालय परिसरातून येणारी वाहने आणि धायरी, नऱ्हे, खडकवासला भागांतून येणारी वाहने एकत्र येतात. सायंकाळी उड्डाणपूल, कालवा रस्ता आणि पुलाखालून येणारी वाहने फनटाइम चित्रपटगृहाजवळील चौक आणि वडगाव उड्डाणपुलाखाली अडकतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा धायरीपर्यंत पोहोचत आहेत.
नागरिकांनी विठ्ठलवाडीतील पदपथाची रुंदी कमी करून अतिरिक्त जागा उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तसेच राजाराम पूल येथील बसथांबा बंद करून बसेस थेट उड्डाणपुलावरून नेल्यास पुलाखालील ताण कमी होऊ शकतो. प्रमुख चौकांत पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करून रस्ता कोंडीमुक्त करण्याची गरज आहे.
कोंडीची प्रमुख कारणे
रस्ते समपातळीत नसणे, खड्ड्यांमध्ये पाणी साचणे आणि बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधील माती रस्त्यावर आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. सिग्नल यंत्रणेत समन्वय नसणे, वाहनचालकांकडून नियमांचे होणारे उल्लंघन, पदपथांवरील अतिक्रमणे आणि पेट्रोल पंपाबाहेरील वाहनांच्या रांगांमुळे एक मार्गिका बंद होणे, अशा विविध कारणांमुळे कोंडीत भर पडत आहे. उड्डाणपूल तयार करताना महापालिकेचे नियोजन अभ्यासशून्य असल्याचा आरोप नागरिक चैतन्य पुरंदरे यांनी केला आहे.
प्रशासकीय भूमिका आणि उपाययोजना
वाहतूक निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, ‘‘सततचा पाऊस आणि धरणातून झालेल्या विसर्गामुळे शिवणे पूल पाण्याखाली जाणे, महामार्गावरील पुलाचे अंतिम टप्प्यातील काम आणि वॉर्डनची अपुरी संख्या यामुळे कोंडी होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.