‘उद्या सकाळी दहा वाजता मी घरी येणार आहे.’ मंजूषाचा निरोप ऐकून, अमोल सावध झाला.
‘उद्या सकाळी दहा वाजता मी घरी येणार आहे.’ मंजूषाचा निरोप ऐकून, अमोल सावध झाला.
‘मला तुझ्यावाचून करमत नाही, तरी पण तू अजून दोन- तीन दिवस राहायला हरकत नाही. तू घरी नसल्याने मला घर अक्षरक्षः खायला उठतं आणि मग घाबरलेला जीव रात्री मित्रांना बोलावतो.’ असं म्हणून अमोलने जीभ चावली.
‘मी माहेरी गेली, की तुमची थेरं मला माहिती आहेत. रोज रात्री पार्ट्या करून, घराचा पार उकिरडा केला असेल.’ मंजूषाने रागाने म्हटले.
‘अगं खरंच तसं काही नाही. घर एकदम आरशासारखं लख्ख आहे.’ अमोलने घरात केविलवाणी नजर टाकून म्हटले.
‘काहीही सांगू नका. मी काय तुम्हाला आज ओळखत नाही.’ मंजूषाने म्हटले.
‘अगं आता मी फार सुधारलोय. तू गेल्यापासून घराची फार काळजी घेतली आहे.’ घाम पुसत अमोलने म्हटले.
त्यानंतर मात्र तो घाबरला. घराची साफसफाई करण्यासाठी त्याने आॅफिसला सुटी टाकली.
सुरवातीला त्याने किचनओटा आवरायला घेतला. गेल्या आठवडाभरात अनेकवेळा दूध व चहा उतू गेल्याचे पुरावे अजून तसेच होते. अर्ध्या तासात त्याने किचनओटा लख्ख केला. त्यानंतर त्याने सगळी भांडी घासली. उत्साहाच्या भरात त्याने फळीवरील भांड्यांवरही हात साफ केला. फरशीवर त्याने पावडरीचे पाणी टाकले व तो फरशी घासत बसला. आरशासारखी फरशी दिसू लागल्यावरच तो थांबला. त्यानंतर सोफ्यावरील ओला टॉवेल व अस्ताव्यस्तपणे टाकून दिलेले कपडे उचलून वाळत घातले. इकडे- तिकडे पसरलेले पेपर नीट गोळा करून, त्यांची घडी घालून रद्दीत टाकले. दारामागील व बाल्कनीत ठेवलेल्या बाटल्या गोळा केल्या व भंगारवाल्याला फोन करून, त्याला फुकट दिल्या. नंतर त्याने कपड्यांचे कपाट आवरायला घेतले. कसेही फेकून दिलेल्या कपड्यांची नीट घड्या घालून ठेवल्या. बेडरूममधील बेडची साफसफाई केली व बेडशीट धुवायल्या टाकल्या. दारे व खिडक्यांना लागलेली धूळ ओल्या कपड्याने पुसून घेतली. कॉम्प्युटर टेबल आवरला. घरातील पंख्यांची साफसफाई केली. या सगळ्या साफ-सफाईत त्याचा दिवस गेला. दिवसभर राब राबल्याने त्याला थकवा आला होता. त्यामुळे बेडवर पाठ टेकताच त्याला गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्याने पुन्हा घर आवरण्यास सुरवात केली. फरशी व दरवाजावर पुन्हा एक हात मारला. घर आता आरशासारखे लख्ख दिसत होते. जिथल्या वस्तू तिथेच आहेत ना, याची पुन्हा एकदा त्याने खात्री केली. बरोबर दहाच्या सुमारास मंजूषा आली. बॅग ठेवल्यानंतर ती किचनमध्ये गेली. स्वच्छ आवरून ठेवलेला किचनओटा, जागच्या जागी ठेवलेली चमचमणारी भांडी व लख्ख फरशी पाहून तिचा चेहरा आनंदाने फुलला. बेडरूम व कपड्यांचे कपाट पाहून तर ती कमालीची सुखावली. सोफा, बाल्कनी, हॉल येथे तर कमालीचा टापटीपपणा होता. आता आपण खुशीने वेडे होतोय की काय अशी शंका तिला आली.
‘खरंच तुम्ही घराची खूप काळजी घेता. एवढी स्वच्छता आणि टापटीपपणा मलाही कधी जमत नाही. खरंच तुम्ही ग्रेट आहात.’ मंजूषाने असं म्हटल्यावर अमोलचा चेहरा फुलला. कॉलर टाईट झाली.
‘मी उगाचंच कामवाल्या बाईला एवढं महत्त्व देत होते. तिने काम सोडू नये म्हणून तिच्या पुढे पुढे करते. तिच्यापेक्षा तुम्ही दहापट चांगले काम करता. आजपासून मी कामवाल्या बाईला कायमची सुटी देते. तुम्ही अशीच कामं रोज करत जा.’ मंजुषाचं बोलणं ऐकून अमोलला आरशासारख्या लख्ख फरशीवर आपला पडलेला चेहरा स्पष्ट दिसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.