Panchnama
Panchnama Sakal
पुणे

Panchnama : खुलाशावर खुलासा फुकट गेला वळसा!

सु. ल. खुटवड

टेबलवर ठेवलेले तुझे पत्र मिळाले. खरं तर मला सोडून माहेरी जाण्यापेक्षा तू माझ्याशी बोलायला हवं होतं. म्हणजे तुझा गैरसमज दूर झाला असता.

प्रिय बायको,

टेबलवर ठेवलेले तुझे पत्र मिळाले. खरं तर मला सोडून माहेरी जाण्यापेक्षा तू माझ्याशी बोलायला हवं होतं. म्हणजे तुझा गैरसमज दूर झाला असता. मी तुला अनेकदा फोन केले. मात्र, माझा फोन तू घेत नाहीस म्हणून मी तुला हे पत्र लिहित आहे.

‘तुम्ही मला अंधारात ठेवलं’ हा आरोप पत्राच्या सुरवातीलाच तू केला आहेस. त्यानंतर लगेचच मी घरातील ट्यूब व बल्ब मोजले. संपूर्ण घरामध्ये मी चार ट्यूब व पाच बल्ब लावले असल्याचे मला दिसले. एवढे ट्यूब व बल्ब लावले असताना मी तुला ‘अंधारात ठेवलं’ असं कसं तू म्हणू शकतेस?

‘तुमचं बाहेर काहीतरी चालू आहे’ असं तुझं दुसरं वाक्य आहे. अगं मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्यामुळे ‘बाहेर माझी नोकरी चालू आहे’ हे तुला माहिती नाही का? उलट कोरोनाच्या काळात व नंतरही अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र, तरीही माझी नोकरी चालू आहे, याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. त्यामुळे बाहेर माझं काही ‘चालू’ नाही तर माझी नोकरी ‘चालू’ आहे, हे लक्षात घे.

‘मी घरात मरमर मरते आणि तुम्ही घराबाहेर रंग उधळता’ असाही आरोप तू केला आहेस. खरं तर वर्षातून मी एकदाच रंग उधळतो. तेसुद्धा रंगपंचमीच्या दिवशी. तुझा विरोध असेल तर रंगपंचमीच्या दिवशी मी रंग उधळणार नाही. त्यात काय एवढे. मी घरातच रंग उधळेन. पण घरात सगळी फरशी घाण केली, असं म्हणून माझ्याशी भांडायचं नाही, आधीच सांगतो.

प्रिय बायको, तुमचा बाहेरख्यालीपणा वाढतच चालला आहे, असंही तू म्हटलं आहेस. खरं तर या अवघड शब्दाचा नेमका अर्थ मला कळला नाही. मी ‘बाहेर खातो’ यासंदर्भातील हा शब्द असावा, असे मला वाटते. खरं तर अनेकदा तुला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. मग तूच म्हणतेस, ‘आजच्या दिवस बाहेर खा’ आता तुझ्या परवानगीनेच मी ‘बाहेर खातो’ तरीही तू ‘माझा बाहेरख्यालीपणा’ वाढलाय, असे म्हणतेस, हे बरोबर नाही.

‘तुम्हाला बाहेर उकिरडे फुंकायला पाहिजेत’, असाही आरोप तू केला आहेस. मात्र, पुण्यासारख्या शहरात उकिरडे राहिलेत कोठे? आणि मी ते कशाला फुंकायला जाऊ? मला ताकसुद्धा फुंकायला आवडत नाही तर उकिरडे कशाला फुंकू?

प्रिय बायको, ‘माझा केसाने गळा कापला’ असाही तू आरोप केला आहेस. हा आरोप करताना तू मला हिणवलं, याचं मला फार दुःख झाले. मला संपूर्ण टक्कल आहे, हे तुला माहिती असताना मी केसाने गळा कसा काय कापू शकतो, हा प्रश्‍न तुला का पडला नाही?

‘तुमच्याबरोबर एवढे वर्षे मी संसार केला पण तुम्ही कधी ‘ताकास तूर लागू दिला नाही’ असं म्हटलंय. आपलं लग्न झाल्यानंतर फ्रीजचं काम तू माझ्याकडे दिलं होतंस. एकदा मी फ्रीजमध्ये ताकाशेजारी तूर ठेवली होती. त्यावेळी तू सांगितलंस की फ्रीजमध्ये ताकाशेजारी तूर वगैरे ठेवायचं नाही. तेव्हापासून मी ‘ताकास तूर लागू देत नाही’. ताक फ्रीजमध्ये ठेवलं तर तूर मी भांड्यात ठेवतो. हे काय चुकीचं आहे का?

ता. क. - एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, असं तू म्हटलं आहेस पण म्यान आणि मन दोन्ही मोठं केलं तर काहीही अवघड नाही. तू समजतेस तेवढी स्मिता वाईट नाही.

- कळावे, तुझा लाडका नवरोबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT