सोलापूर : अतिक्रमण हटवितानाचे संग्रहित छायचित्र.
किंवा
PNE26W19340
बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) : अतिक्रमण हटविण्यापूर्वीचे दर्ग्याचे संग्रहित छायाचित्र.
---
बोरामणी दर्गा परिसरात होणार हद्द निश्चिती
पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून वन विभागाकडून उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १५ : बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील राखीव वनक्षेत्रातील दावल मलिक दर्गा परिसरात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणावर वन विभागाने कारवाई करत ६ मे रोजी ते हटविले. आता या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी वनविभाग हद्द निश्चिती करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे. येथे वन विभागाचा कायम पहारा राहणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगुर्डे यांनी दिली.
बोरामणी येथील गट क्रमांक ७६९ मध्ये सुमारे दीडशे हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. या परिसरात धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर दावल मलिक बाबा पीर दर्गा आहे. गाव नमुना क्रमांक ‘१ अ’ मधील नोंदीनुसार १८८४ मध्ये वनजमाबंदी अधिकाऱ्यांनी दर्गा आणि विहिरीपर्यंत जाण्यासाठी तसेच पूजेसाठी हक्क मान्य केले होते. सर्व्हे क्रमांक ३३८ च्या नकाशातही दर्ग्याची नोंद आहे. मात्र मूळ दर्गा क्षेत्राबाहेर वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पत्र्याचे शेड, टपऱ्या, पक्की बांधकामे तसेच पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या. या प्रकरणी वन विभागाने जुलै ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत १५ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. यासंदर्भात पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीही मांडण्यात आली होती. त्यानंतर अतिक्रमण हटवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश मिळाल्यानंतर ६ मे रोजी कारवाई करण्यात आली.
---
पक्क्या बांधकामांना बंदी
दर्गा परिसरात पूजेसाठी परवानगी असली तरी कायमस्वरूपी घरे किंवा सुविधा उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही. वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरणही करता येणार नाही. तसेच वन जमिनीवर जेवणावळी, कत्तली किंवा इतर अनधिकृत उपक्रमांना बंदी असणार आहे. दरवर्षी उरुस सुरू होण्यापूर्वी वन विभाग नियम व अटी लागू करूनच यात्रेस परवानगी देणार असून, त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार आहेत.
---
उपाययोजनांची अंमलबजावणी
- वन जागेवर २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार
- वनक्षेत्र, दर्गा आणि खासगी क्षेत्राची मोजणी करून हद्द निश्चित केली जाणार
- वन जमिनीच्या सीमारेषा दर्शविणारे कायमस्वरूपी पिलर उभारले जाणार
- ब्रिटिशकालीन दगडांच्या आधारे आवश्यक ठिकाणी तारेचे कुंपण उभारले जाणार
---
कोट
PNE26W19335
वन विभागाला वन विभागाच्या हद्दी माहिती आहेत. मात्र सर्व सामान्य नागरिक व भाविकांना याची माहिती व्हावी यासाठी ब्रिटिशकालीन दगडांनुसार (उरळी) सिमेंट काँक्रिटचे पिलर उभे करण्यात येणार आहेत. यात्रा काळात देखील वन विभागाच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करता येणार नाही.
- राेहितकुमार गांगुर्डे, वनपरिक्षेत्र अधिकारी
---
वनक्षेत्रातील धार्मिक विधींमुळे पर्यावरणावर परिणाम
- मानवी गर्दी आणि गोंगाटामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होतो
- धार्मिक स्थळांच्या नावाखाली अवैध बांधकामे वाढतात
- प्लास्टिक व निर्माल्यामुळे प्रदूषण वाढते
- अगरबत्ती, कापूर किंवा अग्नीमुळे वणव्याचा धोका निर्माण होतो
- पाण्याच्या स्त्रोतांवर ताण वाढून वन्यजीवांना फटका बसतो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.