आठ तासांत तीन दुचाकी चोरींचा छडा
संशयित जेरबंद तक्रार प्राप्त झाल्यानंतर वेगवान तपास
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १३ : सरस्वती चौक परिसरातून एकाच दिवशी चोरीला गेलेल्या तीन मोटारसायकलींचा तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत छडा लावण्यात फौजदार चावडी पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे रोहन सुभाष बालनकर (वय २६, रा. एन.जी. मिल चाळ, मुरारजी पेठ) याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख १० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री पावणेनऊ या वेळेत सरस्वती चौक परिसरातील ॲटलान्स शोरूम आणि नितीन बिर्याणी दुकानासमोरून तीन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. तानाजी पसुल (एमएच १३ डीडी ४०३७), तानाजी चव्हाण (एमएच १३ डीए ९२४७) आणि युसूफ चौधरी यांच्या (एमएच १३ एडी ९१८७) दुचाकींचा त्यात समावेश होता. या प्रकरणी १२ नोव्हेंबरला फौजदार चावडी पोलिसांत स्वतंत्र तक्रारी दाखल झाल्या.
एकाच दिवशी आणि जवळपासच्या परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती तपासली. तिन्ही चोऱ्यांमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, रोहन बालनकर हा चोरीच्या दुचाकीसह पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुरारजी पेठेतील जुनी मिल कंपाउंडमधील कडबा मैदान येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने तिन्ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अवघ्या आठ तासांत तिन्ही गुन्ह्यांची उकल केली.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्यासह पोलिस अंमलदार विनायक काळे, महेश शिंदे, बसवराज परीट, सुधाकर माने, सुहास गायकवाड, अजय चव्हाण, विनायक जाधव, सूरज सोनवलकर, पंकज घाडगे, कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, शशिकांत दराडे आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.