जिल्ह्यात ३९२ कोटींची ऊसबिले थकीत
हंगाम संपूनही अंतिम दराची रक्कम अद्याप प्रलंबित; शेतकरी आर्थिक कोंडीत
सकाळ वृत्तसेवा
माळीनगर, ता. २२ : सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाने यंदाच्या हंगामात विक्रमी गाळप करून हजारो कोटींची उलाढाल केली असली, तरी शेतकऱ्यांच्या हक्काच्या ऊसबिलांचा प्रश्न अद्याप कायम आहे. साखर आयुक्तालयाच्या १५ जूनअखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे तब्बल ८७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. तर कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊसदरानुसार २३ कारखान्यांकडे सुमारे ३९२ कोटी रुपयांची ऊसबिले अडकून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
---
एफआरपी दिली; पण जाहीर दराची बिले रखडली
जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांमध्ये यंदा एक कोटी ५९ लाख ६९ हजार ७१० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यापोटी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार २९१ कोटी रुपयांची ऊसबिले जमा करण्यात आली आहेत. मात्र, हंगाम संपून चार महिने उलटले आणि अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन सहा महिने पूर्ण झाले तरी शिल्लक बिले मिळालेली नाहीत. साखर आयुक्तांकडून होणारी आरआरसी कारवाई टाळण्यासाठी काही कारखानदार केवळ एफआरपीची रक्कम अदा करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. मात्र, कारखान्यांनी जाहीर केलेल्या अंतिम ऊसदराची उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
---
आंदोलनानंतरही बिले रखडली
धोत्री येथील गोकूळ शुगर्ससह काही कारखान्यांच्या थकीत ऊसबिलांसाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. आंदोलनानंतर बिले अदा करण्याची आश्वासने देण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नसल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.
---
दुष्काळी छायेत शेतकरी दुहेरी संकटात
यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप हंगामाबाबत आधीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकरी धास्तावलेले असतानाच थकीत ऊसबिलांचा डोंगर वाढत असल्याने ग्रामीण अर्थचक्रावर परिणाम होत आहे. त्यामुळे थकीत ऊसबिले तातडीने अदा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
---
चौकट
कारखानानिहाय थकीत एफआरपी (कोटी रुपयांत)
सिद्धेश्वर : ३०.३४
संत कुर्मदास : १५.९८
मातोश्री : १.१५
जयहिंद : ०.४०
ओंकार (तडवळ) : ७.२६
भीमा : १९.७२
आवताडे शुगर्स : ३.५९
कमलाभवानी : ९.००
---
चौकट
जाहीर दरानुसार ऊसबिले अदा केलेले कारखाने
पांडुरंग, सहकार महर्षी, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर व करकंब), लोकनेते, लोकमंगल (बीबीदारफळ व भंडारकवठे), जकराया, आष्टी शुगर, सीताराम महाराज, विठ्ठल (वेणुनगर) आणि लोकशक्ती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.