वास्तव वेध
प्रभाग क्रमांक ७
विकासकामांची मोठी गरज; अपुऱ्या निधीमुळे नगरसेवकांची कसरत
गटारी, रस्ते, सुशोभिकरण, विजेचे खांब आदी कामांसाठी अतिरिक्त निधीची अपेक्षा; विविध योजनांकडे लागल्या नजरा
अप्पासाहेब हत्ताळे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : शहराच्या मध्यवर्ती भागाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ७ मध्ये मूलभूत सुविधा आणि सुशोभीकरणाच्या कामांची मोठी गरज आहे. मात्र, भांडवली निधीतून प्रत्येक नगरसेवकाला अपेक्षित ५० लाख रुपयांऐवजी केवळ २५ लाख रुपये उपलब्ध झाल्याने विकासकामांवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती (डीपीसी), अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, नगरोत्थान योजना तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून अतिरिक्त निधी मिळण्याची अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
प्रभागात कसबा परिसरासह उमानगरी, निराळे वस्ती, अवंतीनगर, मनोहरनगर, यशनगर भाग-दोन, अभिषेकनगर आणि हांडे प्लॉट या भागांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि चित्रपटगृहेही याच प्रभागात असल्याने येथे नागरी सुविधांची आवश्यकता अधिक आहे. गटारी, रस्ते, विजेचे खांब, सुशोभीकरण तसेच इतर मूलभूत सुविधांची कामे प्राधान्याने होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या आर्थिक मर्यादांमुळे सध्या प्रत्येक नगरसेवकाला २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून उर्वरित २५ लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात देण्याचे नियोजन आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रभागातील विकासकामांच्या तुलनेत हा निधी अत्यंत अपुरा असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
मनोहरनगरमध्ये गटारी, उमानगरीतील रस्ते, निराळे वस्ती आणि अवंतीनगरमधील सुशोभिकरण, तसेच यशनगर भाग-दोन, अभिषेकनगर, हांडे प्लॉट आणि निराळे वस्तीमध्ये नवीन विजेचे खांब उभारण्याची गरज आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके, खुल्या व्यायामशाळा आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी या प्रभागासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीसह राज्य शासनाच्या विविध योजनांतून आणखी निधी मिळाल्यास प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.
-------------------
PNE26W40441
आमच्या प्रभागात शहरातील मध्यवर्ती भागाचा समावेश आहे. येथे गटारी, रस्ते, सुशोभीकरणाची मोठ्या प्रमाणात कामे अपेक्षित आहेत. मात्र, भांडवली निधीतून मिळालेला निधी अपुरा आहे. त्यामुळे डीपीसीसह विविध योजनांतून अतिरिक्त निधी मिळणे आवश्यक आहे. महापालिकेसह आमदार आणि नगरविकास खात्याकडून निधी उपलब्ध व्हायला हवा.
- अमोल शिंदे, नगरसेवक
-------------------
PNE26W40434
प्रभागातील एखाद्या कामासाठीच ५० लाख रुपयांचा निधी अपेक्षित असतो. मात्र, भांडवली निधीतून केवळ २५ लाख रुपये मिळाले आहेत. उर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात मिळणार असल्याने सध्या उपलब्ध निधी अपुरा आहे. प्रभागात गटारी, रस्ते, विजेचे खांब उभारण्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी बाके आणि खुल्या व्यायामशाळांचीही आवश्यकता आहे. त्यासाठी आणखी निधी मिळणे गरजेचे आहे.
- श्रद्धा पवार, सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.