माळेगाव, ता. २५ : शिक्षण घेताना वर्गात, खासगी क्लासेसमध्ये किंवा प्रवासादरम्यान कोणी टिका-टिप्पणी, टोमणे, छेडछाड अथवा मानसिक- शारीरिक छळ करत असेल, तर तो मुकाट्याने सहन करू नका. निर्भयपणे त्याला सामोरे जा आणि तात्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांना कळवा, असे आवाहन माळेगाव (ता. बारामती) पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास साळवे यांनी केले.
माळेगाव शहरातील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात आयोजित ‘पोलिस-विद्यार्थी संवाद’ या उपक्रमात पोलिस अधिकारी साळवे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. “वर्गात मुलींना विनाकारण त्रास देणे, अपमानास्पद वर्तन करणे, पाठलाग करणे, एकतर्फी प्रेमातून दबाव आणणे किंवा सोशल मीडियाद्वारे छळ करणे हे प्रकार गंभीर आहेत. हे थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी निर्भीड आणि धाडसी बनणे आवश्यक आहे,” असे साळवे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील आठवड्यात एका प्राध्यापकावर विद्यार्थ्यांच्या छळप्रकरणी ‘पॉक्सो’सारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. “केवळ शिकायचे आहे म्हणून अनेक मुली घडणारे प्रकार घरी सांगण्यास घाबरतात. शिक्षण बंद होईल, अशी भीती त्यांच्या मनात असते. मात्र अन्याय सहन करणे हा उपाय नाही. तक्रार केल्यास पोलिस तत्काळ कारवाई करतील,” असेही आश्वासन साळवे यांनी दिले. शैक्षणिक काळात सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा, गरजेपुरताच वापर करावा, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना बजावले. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संदीप शहा यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
पोलिसांच्या साक्षीने उघडणार तक्रार पेटी
शिवनगर येथील शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटीची सुविधा उपलब्ध आहे. आता ही तक्रार पेटी पोलिसांच्या साक्षीने नियमितपणे उघडली जाणार आहे. मुलींनी निःसंकोचपणे तक्रार नोंदवावी किंवा थेट पोलिसांशी संपर्क साधावा. मुलींना नाहक त्रास देणाऱ्यांचा कठोर बंदोबस्त केला जाईल, असे प्राचार्य संदीप शहा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.