कारखाने १५ ऑक्टोबरला
सुरू केल्यास बंद पाडू ः शेट्टी
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : राज्य सरकारने यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. साखरेचा साठा संपत आल्याने केंद्राच्या दबावातून कारखाने लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
शेट्टी म्हणाले, ‘‘गळीत हंगाम लवकर सुरू केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊस शेतात आणखी काही काळ राहिल्यास वजन आणि साखर उताऱ्यात वाढ होऊ शकते. मात्र गळीत हंगाम लवकर सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या उसाची लवकर तोडणी होऊन त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. साखर उद्योगातील परिस्थितीचा विचार करून सरकारने गळीत हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित करावी. केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगाचे नुकसान होणार आहे. लवकर गळीत हंगाम सुरू केल्यास उसाची रिकव्हरी दीड टक्क्यापर्यंत घटू शकते. त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिटन सुमारे ५०० रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. ऊस शेतात आणखी काही दिवस राहिल्यास सहा कांडीपर्यंत वाढ होऊन वजन वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लवकर तोडण्याची घाई सरकार का करीत आहे, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.
साखरेची एमएसपी पाच हजार रुपये करावी, इथेनॉलच्या दरात ७० रुपयांची वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी १० ऑक्टोबरला ऊस परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे २९ सप्टेंबरला कर्नाटकातील हुबळी येथे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
चौकट -----
शक्तिपीठ महामार्गाला विरोध
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ मार्गाला शेतकरी विरोध करत आहे. खटाव, माण तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या असून, या बाबत पुढील काही दिवसांत आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.