आळंदी, ता. ३ : टाळ-मृदंगाच्या निनाद...रांगोळी आणि पुष्पांच्या पायघड्या...बग्गीतून काढलेली शाही थाटातील मिरवणूक...आळंदीचे माजी नगराध्यक्ष आणि ज्ञानेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा थाटात पार पडला. यावेळी रक्तदान शिबीर, ग्रंथतुला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले होते.
यानिमित्त ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून दरवर्षी १११ गरीब, हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १००० रुपये, अशी १ लाख ११ हजार रुपयांची ‘सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती’ योजना जाहीर करण्यात आली. त्याचा धनादेश प्राचार्य राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची शासकीय शिष्यवृत्ती न मिळणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष, सकल जैन संघ (पुणे जिल्हा) उपाध्यक्ष सुरेश वडगावकर वयाच्या ८३व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळा रविवारी (ता. १) विविध उपक्रमांनी संपन्न झाला. यामध्ये वडगावकर आणि त्यांच्या पत्नीची बग्गीतून टाळ-मृदंगाच्या निनादात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ ‘जय महावीर -जय आनंद’च्या जयघोषात मिरवणूक काढली.
आमदार बाबाजी काळे व बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी देवस्थान प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, डॉ. नारायण महाराज जाधव, जयस्मितज महाराज यांची उपस्थिती होती.
यावेळी विविध विषयांवरील शैक्षणिक, संस्कारक्षम व प्रेरणादायी पुस्तकांचे माध्यमातून वडगावकर यांची ग्रंथतुला करण्यात आली. जमा झालेले ग्रंथ, पुस्तके ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट देण्यात आले.
विद्यालयामध्ये रांगोळी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. जवळपास ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव वतीने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेतले. यामध्ये ४०० लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली. पैकी २१ जणांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. रक्तदान शिबिराचे आयोजन रेड ब्लड बँकेच्या माध्यमातून करण्यात आले.
दरम्यान, ८३ मृदंगांच्या निनादात हजारो वारकरी विद्यार्थ्यांच्या वतीने हरिपाठ झाला. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन झाले. कल्याण गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘माझ्या वडिलांची मिराशी गा देवा’ गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.