समाजसेवेचा संस्कार रुजवणारे : तानाजी दळवी (नाना)
सातारा शहराच्या जडणघडणीत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, कामातील सचोटीला आयुष्याचे ब्रीद मानले आणि समाजकार्यातून आपले वेगळेपण जपले, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे (कै.) तानाजी सखाराम दळवी. सर्वांच्या ओळखीचे ‘नाना’.
नानांनी उभारलेली प्रत्येक इमारत आज त्यांच्या कार्याची साक्ष देते; पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी उभारलेली माणसं आणि जपलेली नाती. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची भावना हे त्यांचे आयुष्यभराचे भांडवल होते. अशा नानांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना दाटलेल्या आठवणींतून...
- प्रसाद तानाजी दळवी
................................................
आज नाना आपल्या सोबत नसले तरी त्यांनी उभारलेली कामे, दिलेले संस्कार आणि समाजासाठी केलेले योगदान हेच त्यांच्या आयुष्याचे खरे स्मारक आहे.
लहान वयातच कठीण प्रसंगांची मालिका त्यांच्या आयुष्यात उभी राहिली. वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचे आणि चौदाव्या वर्षी आईचे छत्र हरपले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि देशसेवेच्या भावनेतून सीआरपीएफमध्ये प्रवेश घेतला.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूविरुद्ध लढताना जखमी अवस्थेतही त्यांनी देशासाठी योगदान दिले. या शौर्याची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांची भेट घेऊन रोख भरपाई जाहीर केली. देशसेवेचा तो अध्याय पूर्ण करून नाना साताऱ्यात परतले आणि मिळालेल्या मोबदल्यातून बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकले.
गेली चार दशके त्यांनी बांधकाम क्षेत्रात केवळ इमारती उभारल्या नाहीत, तर विश्वास, दर्जा आणि टिकाऊपणाचे मानदंड प्रस्थापित केले. ‘काम हाती घेतले म्हणजे ते केवळ पूर्ण करायचे नाही, तर वर्षानुवर्षे टिकेल असे उभे करायचे,’ असा त्यांचा कटाक्ष होता.
सातारा शहरातील अनेक विकासकामांना त्यांनी मूर्त स्वरूप दिले. दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विविध प्रकल्पांची अंमलबजावणी नानांच्या विश्वासार्हतेवरच सोपवली जात असे.
शाहू कलामंदिर, अजिंक्यतारा किल्ला येथील दूरचित्रवाणी इमारत, चार भिंती स्मारक, तसेच राजवाडा मंडई यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग होता. याशिवाय शहरातील विविध भागांतील समाजमंदिरे, पूल आणि इतर सार्वजनिक कामांमधून त्यांनी साताऱ्याच्या विकासात मोलाची भर घातली.
नानांच्या आयुष्याचा आणखी एक ठसा म्हणजे त्यांची कौटुंबिक परंपरा. प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणाचे संस्कार दिले. नानांनी मला मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगसाठी प्रेरित केले. त्यात प्रावीण्य मिळवत मुंबई विद्यापीठातून मला सुवर्णपदकही पटकावता आले. पुढे स्पेनमधील माद्रिद येथे इंटरनॅशनल एमबीए पूर्ण केले. सध्या यूबीएस या स्वीस बँकेत संचालक पदावर कार्यरत होण्याचा योग हा नानांचा आशीर्वादच.
नानांची स्नुषा मेघना या मेकॅनिकल इंजिनिअर असून, त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रॉडक्शन प्लॅनिंग मॅनेजर म्हणून कार्य करत कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. मुलगी सुप्रिया या एमए, बीएड शिक्षण घेऊन महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व कर्नाटक येथील विविध शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत राहिल्या आहेत. जावई सुरेशकुमार हे देशातील अनेक नामांकित शाळांचे मुख्याध्यापक म्हणून परिचित आहेत.
नानांनी उभारलेली प्रत्येक इमारत आज त्यांच्या कार्याची साक्ष देते; पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी उभारलेली माणसं आणि जपलेली नाती. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची भावना हे त्यांचे आयुष्यभराचे भांडवल होते. आज नाना आपल्या सोबत नसले तरी त्यांनी उभारलेली कामे, दिलेले संस्कार आणि समाजासाठी केलेले योगदान हेच त्यांच्या आयुष्याचे खरे स्मारक आहे. साताऱ्याच्या विकासकथेत ‘नाना’ हे नाव कायम आदराने घेतले जाईल. कारण त्यांनी केवळ बांधकामे उभारली नाहीत, तर विश्वासाचा पाया घातला. अशा नानांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...
.................................................
साताऱ्याच्या विकासात
नानांची अविस्मरणीय छाप
गेल्या चार दशकांत तानाजी सखाराम दळवी (नाना) यांनी सातारा शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. कामातील सचोटी, दर्जाबाबतची तडजोड न करण्याची वृत्ती आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचा कटाक्ष यामुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले.
दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतील विविध विकासकामांना नानांनी मूर्त स्वरूप दिले. सातारा शहरातील शाहू कलामंदिर, अजिंक्यतारा किल्ला परिसरातील दूरचित्रवाणी इमारत, चार भिंती स्मारक तसेच राजवाडा मंडई (श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भाजीपाला व फळे केंद्र) यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या कार्यशैलीचे साक्षीदार आहेत. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये समाजमंदिरे उभारणे, लहान-मोठे पूल बांधणे आणि पायाभूत सुविधा उभारण्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. नानांनी उभारलेली प्रत्येक वास्तू ही केवळ बांधकाम नव्हे, तर गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि साताऱ्यावरील प्रेम यांचे प्रतीक आहे.
............................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.