बावीत ३६.६८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
छाप्यात ७ जणांवर गुन्हा; महिला अधिकाऱ्यावर वाहन घालण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. २० : राज्यात गुटखाबंदी असतानाही माढा तालुक्यातील बावी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे ३६ लाख ६८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान एका वाहनचालकाने महिला अधिकाऱ्यावर वाहन घालण्याचा प्रयत्न करत त्यांच्या खासगी वाहनाला धडक देऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी ७ जणांविरुद्ध माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (ता. १९) रात्री बावी येथील सिद्धेश्वर मोरे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या एमएच १३ डीक्यू ९५६१, एमएच १३ डीडी ९९०२ व एमएच १३ डीक्यू ८३९५ या वाहनांतून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक व साठवणूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार सहायक आयुक्त रेणुका पाटील यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली.
कारवाईत डायरेक्टर स्पेशल पानमसाल्याचे २३ बॉक्स (४,१४० पाकिटे) व शॉट लक्झरी चिव्हिंग टोबॅकोची ४,३२० पाकिटे जप्त करण्यात आली. तसेच दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली. कारवाईदरम्यान एका वाहनचालकाने महिला अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या खासगी वाहनाला धडक देऊन पळ काढला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्यावर अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत चालक, साठा मालक व वाहनमालक अशा एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सूरज शिंदे करीत आहेत. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुरवठा नेमका कुठे होणार होता, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.