पुणे

शिरूरकरांनी अनुभवला बैलगाड्यांचा थरार

CD

शिरूर, ता. ३ ः घाटाच्या दुतर्फा अमाप गर्दी... भिर्रर्र ची आरोळी होताच गर्दीतून येणारा उदंड प्रतिसाद... भंडाऱ्याची उधळण अन्‌ टाळ्यांचा गजर... बैलांच्या अंगावरील भंडारा, गाडाप्रेमींकडून उधळलेला गुलाल अन्‌ बैलांच्या खूरांमुळे घाटातील लाल मातीचे आसमंतात उधळणारे रंगीबेरंगी लोट... निशाण पडताच सेकंदाची गर्जना अन्‌ पुन्हा एकदा वाद्यांच्या गजरातील जल्लोष... तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर, गाडाशौकीनांच्या अमाप उत्साहाने बहरलेला शिरूरचा शर्यतीचा घाट बैलगाड्यांच्या थराराने अक्षरशः शहारला.

शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री रामलिंग महाराज यात्रेची बैलगाड्यांच्या शर्यतीने सांगता झाली. यात्रेतील तीन दिवसांच्या उत्साहाची तितक्‍याच जल्लोषात सांगता झाली. बैलगाडा शर्यतींवरील बंदीमुळे घाटाची दुरवस्था झाली होती. परंतु यंदाच्या शर्यतीपूर्वी बंदी उठल्याने शिरूर ग्रामपंचायतीने नव्याने भव्य घाट तयार केला. १५८ बैलगाडे शर्यतीत सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता सुरू झालेला शर्यतीचा थरार सायंकाळी साडेपाच पर्यंत चालू होता. मोठ्या कालखंडानंतर बैलगाडा शर्यती होत असल्याने घाट गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. जुने गाडाशौकीन, शेतकरी, कष्टकरी, कामगार व तरूणांसह महिला, मुलींनीही गाडे पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती.
रांजणगाव गणपती येथील गणपत विष्णू खेडकर यांच्या गाड्याने ‘घाटाचा राजा’ हा किताब पटकावला; तर पांडुरंग काळे (गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) यांचा गाडा स्पर्धेतील विजेता ठरला. दिगंबर पोखरकर (वडगाव पीर, ता. आंबेगाव), बाळासाहेब ढोबळे (झारकरवाडी, ता. आंबेगाव), अमोल वर्पे (बोऱ्हाडे मळा, शिरूर), जानकीराम कुरंदळे (अण्णापूर, ता. शिरूर), दीपक उचाळे (डोंगरगण, ता. शिरूर), अक्षय ढेरे (केंदूर, ता. शिरूर) व शिवराज आव्हाळे (आव्हाळवाडी, ता. हवेली) यांच्या गाड्यांनी पहिल्यात पहिला येण्याचा मान मिळवला.
या स्पर्धेसाठी सुमारे पाच लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष संपत खेडकर, शिरूरचे सरपंच नामदेव जाधव, माजी सरपंच अरुण घावटे, शिवसेवा मंडळ ट्रस्ट चे विश्‍वस्त ॲड. सुभाष पवार, शिरूर डॉक्‍टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विक्रम घावटे, उद्योजक किरण पठारे पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस तुळशीराम परदेशी, खजिनदार पोपटराव दसगुडे, गोधाजी घावटे, रावसाहेब घावटे, वाल्मिकराव कुरंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेवराव घावटे, जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डिले, कारभारी झंजाड उपस्थित होते.

PNE22S47247

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: पानिपतकार विश्वास पाटील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kamshet News : कामशेतमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे ढीग,दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; व्यवस्थापनाअभावी गंभीर परिस्थिती

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारमध्येच जुगलबंदी: भुजबळ-विखे पाटलांमध्ये मतभेद

Sangli Crime News : राजकीय स्वीय सहायकाचा त्रास, पंचायत समितीतील २७ वर्षीय अभियंत्याचा मृत्यू; कृष्णा नदीत मृतदेह सापडल्याने आरोप...

PCMC News : नवनगर विकास प्राधिकरणाच्या जमिनी द्या, पीएमआरडीएची मागणी; अतिक्रमणबाधितसह मोकळ्या जागा हव्यात

SCROLL FOR NEXT