आंधळगाव, ता. १२ : उन्हाची तीव्रता वाढत असताना आंधळगाव (ता. शिरूर) येथील गावालगतचा पाझर तलाव अक्षरशः आटण्याच्या उंबरठ्यावर पोचला आहे. पाणीसाठा अत्यल्प असल्याने गावावर भीषण पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. परिस्थिती गंभीर असतानाही प्रशासन हातावर हात धरून बसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या तलावात तातडीने चासकमान धरणाचे पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.
गावात दोन पाझर तलाव असले तरी सध्या केवळ एका तलावातच चासकमानचे आवर्तन सुरू होते. मात्र, तेही गुरुवारी बंद झाल्याने दुसरा तलाव कोरडाच राहणार का?असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाणीपुरवठ्याचा कोणताही ठोस आराखडा नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यंदा समाधानकारक पाऊस होऊनही चासकमान विभागाकडून प्रभावी नियोजन केले नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
उन्हाळा अजून शिगेला पोहोचायचा असतानाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चासकमान धरणातून आंधळगावच्या तलावात तातडीने व नियमित पाणी सोडावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने वेळीच ठोस निर्णय घेतला नाही तर आंधळगावातील शेतकरी व ग्रामस्थांना यंदाचा उन्हाळा पाण्याविना काढावा लागेल, हे वास्तव नाकारता येणार नाही.
पाझर तलावाला थेट पाणी देणे हे कोणत्याही शासकीय नियमात बसत नाही.तरीही आंधळगाव येथील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तलावात पाणी सोडले आहे. मात्र, गावालगतच्या तलावात पाणी सोडणे शक्य होणार नाही.
- धनंजय गावकर, उपकार्यकारी अभियंता, चासकमान उपविभाग शिरूर
जानेवारीपासून तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. सध्या तलावाच्या बहुतांश भागात तडे गेलेली जमीन स्पष्ट दिसत आहे. केवळ मध्यभागी पाणी शिल्लक आहे. दिवसेंदिवस पाणी आटत असल्याने पुढील काही आठवड्यांत तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
- राजेंद्र भोसले, शेतकरी
विहिरी, कूपनलिकांची पातळी खालावली
गावातील शेतकरी व पशुपालकांसाठी हा तलाव जीवनरेषा मानला जातो. पाणी आटल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. चिखलमिश्रित पाणी पाजण्याची वेळ आली असून, जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तलावातील साठा कमी झाल्याने परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पातळीही झपाट्याने खाली गेली आहे. काही विहिरी तळ गाठण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
02799
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.