मांडवगण फराटा, ता. २६ : बाभुळसर बुद्रुक ते गणेगाव दुमाला या सुमारे पावणे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघे पाच दिवस उलटत नाहीत, तोच डांबराचा थर ठिकठिकाणी उखडू लागल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या रस्त्याच्या कामासाठी सुमारे पाच कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच या मार्गासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने हा रस्ता तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंडिकॉट कन्स्ट्रक्शन प्रा. लि. पुणे या कंपनीकडे काम देण्यात आले असून काही तांत्रिक कारणांमुळे अर्धा रस्ता शितोळे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन्ही कंपन्यांनी केलेल्या कामात निकृष्ट दर्जा आढळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यावरची धूळ न झाडताच डांबरीकरण केल्यामुळे डांबर व्यवस्थित चिकटलेले नाही. खडीवर टाकण्यात येणारा २० एमएम जाडीचा थर अनेक ठिकाणी अपुरा असल्याचे निदर्शनास येत आहे. आवश्यक जाडीची डांबरी लेयर न टाकल्याने हा रस्ता सहा महिनेही टिकणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
हे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत झाले असून त्याकडे संबंधित कार्यकारी अभियंता व ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी तातडीने पाहणी करण्याची मागणी सचिन मचाले, सुनील ढमढेरे यांनी केली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच निकृष्ट काम दुरुस्त करून दर्जेदार रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी सचिन मचाले, सुनील ढमढेरे, गणेश मचाले, काकासाहेब खळदकर, मनीषा नागवडे, बाळासाहेब ढमढेरे, नीलेश कोंडे, सोमनाथ नागवडे आदी उपस्थित होते.
शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संदर्भात वरिष्ठ
पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. रस्त्याचे काम दर्जेदार होत नाही तोपर्यंत शासन पातळीवर आवाज उठवला जाईल.
- सचिन मचाले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.