मांडवगण फराटा, ता. २८ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील कावीळ तज्ज्ञ डॉ. धनंजय शिंदे पाटील यांना श्री संत गाडगे महाराज गोरक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने ‘आदर्श डॉक्टर’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पारवडी (ता. बारामती) येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान सोहळा पार पडला. बारामती पंचायत समितीचे सदस्य अनिकेत गावडे यांच्या हस्ते डॉ. शिंदे पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. शिंदे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात कावीळ तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. १९७२ पासून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्य सुरू केले असून तब्बल चार दशकांहून अधिक काळ ते रुग्णसेवेत कार्यरत आहेत. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर त्यांनी लाखो कावीळग्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांना नवजीवन दिले आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी त्यांनी सातत्याने परवडणारी आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून दिली आहे.
कार्यक्रमावेळी संस्थेचे राज्य उपाध्यक्ष मोहन शेलार, विलास माळशिकारे, दादासाहेब सोनवणे, वाल्मीक शितोळे, जगन्नाथ शितोळे, गणेश फराटे, श्रीकृष्ण भोसले, बापूराव गावडे, सुबोध अवचट, युवराज गावडे, सयाजी गवंड आदी उपस्थित होते.