विलास काटे : सकाळ वृत्तसेवा
आळंदी, ता. २६ : हरिनामाच्या गजरात न्हाऊन निघालेली अलंकापुरी... समाधी मंदिरातील काळीभोर समाधी... फुलांची आकर्षक सजावट... सोने-चांदीची आभूषणे... चांदीचा लोभस मुखवटा... अकरा ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषात लाखो भाविकांनी माऊलींच्या महापूजेचा सोहळा मंगळवारी (ता. २६) झाला. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी माऊलींचे लोभस रूप डोळ्यांत साठविले. पाहुनि डोळा, देह हा माऊली माऊली झाला, काहीशी अशीच अवस्था देऊळवाड्यात प्रत्येकाची झाल्याचे चित्र होते.
कार्तिकी वारी माऊलींच्या चरणी रुजू करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. कार्तिकी वारी आणि माऊलींचा संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या भक्तीने अलंकापुरीतील कार्तिकीचा सोहळा आज सजला होता. काल सायंकाळपासून वारीतील भाविकांची गर्दी वाढली. रात्री साडेअकराला देऊळवाड्याच्या पश्चिमेकडील दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग माऊलींच्या पवमान पूजेसाठी बंद ठेवली. देऊळवाड्यातील मानकरी, पुजाऱ्यांनी पवमान अभिषेकासाठी देऊळवाडा रिकामा करून घेतला. पावणेबारा वाजता स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर साडेबारा ते दीड वाजेपर्यंत माउलींना पवमान अभिषेक केला. महाद्वारातील नगरखान्यातून भीमाशंकर वाघमारे यांनी सुरू केलेला सनई- चौघड्यांचा मंजूळ स्वर आणि अकरा ब्रम्हवृदांच्या मंत्रोच्चाराने देउळवाड्यातील वातावरण मंगलमय झाले. समाधी गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांनी सजविला. दरम्यानच्या काळात सिद्धेश्वर मंदिरात रुद्राभिषेक सुरू केला. याचवेळी माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेऊन माउलींना पंचामृत अभिषेक सुरू होता. २१ लिटर दूध, दही, तूप, मध, साखर, आंबारस, सुगंधी, तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करून अभिषेक सुरू होता. नंतर दीड वाजता माऊलींच्या समाधीवरील चांदीचा मुखवटा, मेखला, शाल, तुळशी, मोगऱ्याचा हार आणि डोईवर मुकुट ठेऊन त्यावरील सोनेरी छत्रचामराने समाधीचे रूप खुलून गेले. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि आकर्षक रांगोळ्यांनी देऊळवाड्याची शोभा वाढवली. त्यानंतर आरती करण्यात आली. मानकरी आणि सेवेकऱ्यांना नारळप्रसाद देण्यात आला. गाभारा मंदिरात देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, आमदार बाबाजी काळे, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, डी. डी. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
माऊलींच्या आरतीनंतर समाधी दर्शनासाठी कारंजे मंडपातील निमंत्रित पासधारकांना सोडण्यात आले. पावणेदोन वाजता दशर्नबारीतील भाविकांची रांग सुरू केली. आज दिवसभर महापूजा बंद होत्या. मध्यरात्रीनंतर इंद्रायणीतीरी तीर्थस्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
पोलिसांची उर्मट वागणूक
पहाटपुजेसाठी मंदिर प्रवेशासाठी आळंदीकरांना, मानकऱ्यांना देवस्थानकडून पास दिले होते. पासधारकांना हनुमान दरवाजा आणि महाद्वारातून प्रवेश देण्याच्या सूचना होत्या. महाद्वारातील पोलिस अधिकारी पासधारक, नगर परिषद कर्मचाऱ्यांशी प्रवेश पास दाखवूनही उर्मट वागत असल्याचे चित्र रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत होते. पास दाखवूनही अनेकांना या उर्मट अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.