आळंदी, ता. ४ : पिंपरी चिंचवड महानगर पालिका, तसेच उगमस्थानापासून विविध ठिकाणी नदीपात्रात मिसळत जाणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला आता हिमनगाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शुक्रवारी (ता. ४) सकाळपासून इंद्रायणीच्या पात्रात पांढराशुभ्र फेसाचे मोठ्या आकारातील पुंजके तरंगत असल्याने भाविकांच्या, तसेच जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाची पातळी मोठी असल्याने इंद्रायणीच्या पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
चिखली, कुदळवाडीतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केल्यानंतर इंद्रायणीतील प्रदूषण कमी होईल, असा दावा तेथील राजकीय मंडळी करत होती. मात्र, हा दावा पूर्णतः फोल ठरला आहे. कारण, अद्यापपर्यंत इंद्रायणीच्या प्रदूषणाची पातळी अजिबात कमी झाली नाही. याउलट महापालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे दिवसेंदिवस इंद्रायणीतील पाण्याला उग्र वास, कधी हिरवट तर कधी काळपट रंग होत आहे.
याचबरोबर इंद्रायणीच्या उगमस्थानापासून विविध ग्रामपंचायती, नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. एवढेच काय केळगाव ग्रामपंचायत, आळंदी नगरपरिषदेचे सांडपाणीही इंद्रायणीत सोडले जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नदी बारमाही वाहत असल्याचे चित्र आहे.
जलचर धोक्यात
सध्या आळंदीतील इंद्रायणीत कोठेही जा सांडपाण्यामुळे नदीपात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी काळपट रंगाचे पाणी वाहताना दिसते. याचबरोबर जलपर्णीही मोठ्या प्रमाणात आहे. प्रदूषित पाणी असूनही आळंदीत इंद्रायणी घाटावर अनेक नागरिक या प्रदूषित पाण्यातच स्नान करतात. आचमन करतात. काही लोक कपडे धुतात. गाड्याही धुतात. मात्र, स्थानिक पातळीवर नगर परिषद प्रशासन यावर कोणत्याही प्रकारची बंदी घालताना दिसत नसल्याचे चित्र आहे. प्रदूषणामुळे जलचर प्राण्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.