आळंदी, ता. १३ : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदी (ता. खेड) येथे भरणारी कार्तिकी वारीसाठी लाखो भाविक ये-जा करत आहेत. मात्र, आळंदीतील एसटी महामंडळाच्या जागेमध्ये अस्वच्छतेचे चित्र असून, प्रवेशद्वारातच चिखल झाला आहे.
कार्तिकी वारीसाठी आळंदीला जाता यावे, याकरिता राज्यभरातून ठिकठिकाणांहून साडेतीनशेहून अधिक गाड्या सोडण्यात येत आहेत. गुरुवारी (ता. १३) सकाळी १० ते १५ एसटी गाड्या स्थानकामध्ये बाजूला उभ्या होत्या. चालक आणि वाहकांना जमिनीवरून चालताना चिखल, तसेच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
एसटी स्थानकाच्या जागेतील कचरा जेसीबीच्या साहाय्याने मागच्या बाजूस लोटला, मात्र दुर्गंधी कायम आहे. दोन्ही बाजूने प्रवेशद्वारामध्ये चिखल आहे, तर नगर परिषदेने बाजूलाच सुलभ शौचालयासाठी तात्पुरते शौचालय उभारले आहेत. एसटीच्या गाड्या उभ्या राहण्यासाठी, तसेच कर्मचाऱ्यांना उभे राहण्यासाठी चांगली जागा येथे नाही. ज्येष्ठ प्रवाशांना चालताना उंच सखल जमिनीमुळे त्रास होत आहे. स्थानकाच्या मध्यभागी केलेली मंडप व्यवस्था आणि लाइटची सोय तुटपुंजी आहे. तसेच, इथल्या दुर्गंधीमुळे रात्रीच्यावेळी मच्छरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात साडेपाच एकराहून अधिक जागा असूनही अस्वच्छतेसारखी दुरवस्था येथे कायमच आहे. किमान यात्रा कालावधीत तरी एवढ्या मोठ्या स्वरूपात एसटी गाड्या ये- जा करणार असल्याने स्थानक स्वच्छ ठेवणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाकडून तेही झाले नाही. एसटी स्थानकाच्या दर्शनी भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे एसटीला ये- जा करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
06727