आळंदी, ता. ३० : आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा वार्षिक उत्सव कोठी पूजनाने झाला असून, दोन जानेवारीला रथोत्सवाचा मुख्य कार्यक्रम आहे.
गोपाळपुरा येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा वार्षिक उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच मुंबई आणि आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या उत्सवामध्ये सहभागी होतात. दरम्यान, या वार्षिक उत्सवाची सुरुवात कोठी पूजनाने झाली असून, २ जानेवारीला रथोत्सव तर ३ जानेवारीला मुक्तद्वार अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. ४ जानेवारीला ‘श्रीं’ची दिंडी, काल्याचे कीर्तन आणि पालखी मिरवणूक निघणार आहे. काल्याचे कीर्तन चक्रांकित बुवा यांचे होईल, तर सात जानेवारीला प्रक्षाळपूजन केले जाणार आहे. २१ जानेवारीला माधव महाराज गोडबोले यांची पुण्यतिथी साजरी करून वार्षिक उत्सवाची सांगता होईल. वार्षिक उत्सवादरम्यान पौर्णिमेपर्यंत दररोज गुरुचरित्राचे वाचन होणार आहे.