आळंदी, ता. २४ : ‘‘संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरातील मुक्कामाबाबत प्रशासनाकडून वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची पाहणी ६ मे रोजी केली जाणार आहे. पालखी मार्गावरील भेकराईनगर ते दिवे घाट हा रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. १५ ते १७ मेदरम्यान पालखी मार्गाची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत होणार आहे,’’ अशी माहिती संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी दिली.
पालखी सोहळा नियोजनासंदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अध्यक्षस्थानी होते. बैठकीला आमदार हेमंत रासने, ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, विशाल धनवडे, विविध विभागांचे अधिकारी, तसेच पालखी विठोबा मंदिर विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
ॲड. उमाप म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात चांगल्या सुविधा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला आहे. मुक्कामासाठी पूर्वीची जागा वाढवून आता दहा हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या संदर्भात लेखी प्रस्ताव आल्यानंतर तो पंढरपूर येथे होणाऱ्या दिंडी समाजाच्या बैठकीत मांडला जाईल. त्यानंतर पुण्यातील मुक्कामाची जागा आणि पालखी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जाणार आहे. ६ मे रोजी भवानी पेठ येथील सोयीसुविधांची संयुक्त पाहणी जिल्हाधिकारी आणि देवस्थानचे विश्वस्त करणार आहेत. तसेच फुरसुंगी, भेकराईनगर ते दिवे घाट या मार्गावर रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे वेगाने पूर्ण करण्याची सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, रविवारी (ता. २६) पंढरपूर येथे पुणे मुक्काम ठिकाण व कार्यक्रम पत्रिकेबाबत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे १ मे रोजी जाहीर होणारी कार्यक्रम पत्रिका पंढरपूर येथे होणाऱ्या पुढील बैठकीनंतरच जाहीर केली जाईल.’’
बैठकीतील चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे
- जिल्ह्यातील पालखीतळांचे विस्तारीकरण करणार
- पालखी मुक्कामी जर्मन हँगरची संख्या दुप्पट करणार
- महिलांसाठी स्वच्छ शौचालयांची संख्या वाढविणार
- सासवड मुक्कामासाठी १४ एकर आरक्षित जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने राबवली जाणार
- जेजुरी पालखी तळालगत सात गुंठे जागेच्या भूसंपादनाची देवस्थानकडून मागणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.