आळेफाटा, ता. २ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अहिल्यानगर- कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ग्रुप ग्रामपंचायत वडगाव आनंदमधील मौजे पादीरवाडी हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले असून, या गावाची आजची असणारी लोकसंख्या ही जवळपास बाराशे आहे. या गावाचा परिसर हा डोंगराळ असल्याने येथील नागरिकांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नसल्याने अतिशय काबाडकष्ट करून ते आपल्या मुलांना शिकवत आहेत.
पूर्वी या गावाची ओळख म्हणजे हे गाव प्रत्येक वर्षी अतिशय दुष्काळाला सामोरे जाऊन जीवन जगणारे गाव होते. या गावातून तब्बल ३० मुले, मुली पोलिस दलात कार्यरत आहेत. या गावातील काही कुटुंबं वगळता प्रत्येक कुटुंबातील एक ते दोन व्यक्ती पोलिसपदी कार्यरत आहेत. त्यामुळे हे गाव आता पोलिसदादांचं गाव म्हणून पुढे येऊ लागले आहे. या ठिकाणचे युवक पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी जवळच असलेल्या आळेफाटा या ठिकाणी असलेल्या भाग्यविधाता ॲकॅडमी, सह्याद्री ॲकॅडमी, सूर्या ॲकॅडमी या ठिकाणी सराव करत असतात. यातूनच या गावातील निशा महादू चव्हाण (A.P.I), मीना किसन वऱ्हाडी (PSI), अमोल निवृत्ती गागरे (चेअरमन, नवी मुंबई पोलिस सहकारी पतपेढी), अपेक्षा बाजीराव गागरे, संध्या पांडुरंग गागरे, सुनील मोरे, तुकाराम मोरे, प्रियांका बन्सी पादीर, अभिषेक अनंता पादीर, दीपा महादू चव्हाण, श्यामला रोहिदास देवकर, रतिका गंगाराम गागरे, विनीत सुरेश कुऱ्हाडे, प्रणीत सुरेश कुऱ्हाडे, संतोष सोपान मोरे, नितीन पोपट पादीर, विजय सुदाम मोरे, सारिका विजय गाडेकर, दीपक विजय गाडेकर, अंकिता विजय गाडेकर, सविता सोपान मोरे, सोनाली जयवंत मोरे, सागर सुभाष मोरे, सारिका विजय गाडेकर, आशा विजय गाडेकर, दीपक विजय गाडेकर, रूपाली मोरे, शुभांगी शिंदे, संतोष शिंदे, संदीप शिंदे (Ex. Army) हे तरुण-तरुणी सध्या पोलिस दलात कार्यरत आहेत.
हे सर्व सुट्टीला आल्यानंतर गावातील तरुणांना एकत्र करून पोलिस दलाविषयी माहिती व पोलिस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करतात. वेळप्रसंगी तरुणांना शिक्षा देऊन त्यांच्याकडून मैदानी व बुद्धिमत्ता चाचणीची तयारीही करून घेतात. हे तरुण येथील युवकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. यामुळे गावातील मुलेही पोलिस दलात भरतीसाठी आकर्षित झाले आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते, तसेच विविध खेळांमध्ये विद्यार्थी पुढे असल्याने या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच वडगाव आनंद या गावातील पादीरवाडी तसेच मोरदरा या वस्तीवरील जवळपास ३० जण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांतील ठिकठिकाणी पोलिस दलात काम करत असून, हा आमच्या गावाचा तसेच जुन्नर तालुक्याचा अभिमान आहे. तसेच परिसरातील तरुणांनीदेखील पोलिस दलात जाऊन देशसेवा करावी.
- अमोल गागरे (अध्यक्ष, नवी मुंबई पोलिस सहकारी पतपेढी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.