पारगाव, ता. १३ : दुष्काळी म्हणून ओळख पुसण्यासाठी धामणीतील शेतकऱ्यांनी गाव पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील प्रत्येक मळ्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतीसाठी पाणी नेण्याचे शिवधनुष्य उचलून उपक्रम यशस्वी करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी हिवरकर मळा, टेकाडेमळा, गवंडीमळा, माळीमळा परिसरातील सुमारे दोनशे शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी सव्वाकोटी रुपये खर्च करून डिंभे धरणाचा कालव्यातून सामूहिक सिंचन योजनेच्या कामाचा प्रारंभ केला व शिवार पाणीदार करण्याचा संकल्प केला आहे.
धामणी हे चारही बाजूने डोंगर आहे. येथे पाण्याचा कोणताही नैसर्गिक स्रोत नाही. यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जिरायती भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे ती फक्त पावसाळ्यातच केली जाते. ठोस उत्पन्न नसल्यामुळे नोकरी व्यवासायानिमित्ताने येथील बहुतांश तरुणवर्ग शहराकडे वळत आहे.
दरम्यान, शासन शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करण्याबाबत गांभीर्याने कोणतीही ठोस पावले उचलत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत धामणीतील शेतकऱ्यांनी सामूहिक सिंचन योजना सुरू केला आहे.
दरम्यान, प्रथम २०२१ मध्ये रवींद्र करंजखेले, महेश कदम, श्यामराव करंजखेले यांनी पुढाकर घेत पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत पहिली सामूहिक उपसा सिंचन योजना राबवली. त्यानंतर संदीप बोऱ्हाडे व शांताराम रोडे यांनी पुढाकार घेत १४ शेतकऱ्यांनी दुसरी योजना राबवली. काही महिन्यांपूर्वी सोमनाथ जाधव व चाडदरा परिसरातील शेतकऱ्यांनी तब्बल साठ कुटुंबांनी एकत्र येत सागदरा उपसा सिंचन योजना या नावाने संस्था स्थापन करून सुमारे सव्वा कोटी रक्कम खर्च करून तिसरी सागदरा उपसा सिंचन योजना उभी करून जिरायती भागात जलक्रांती घडवून आणली आहे. आता हिवरकर मळा, टेकाडेमळा, गवंडीमळा, व माळीमळा या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत एकजुटीने सुमारे सव्वाकोटी रुपये खर्चाच्या चौथ्या सामुदायिक सिंचन योजनेच्या कामाचा प्रारंभ केला आहे.
एक महिन्यात योजना कार्यान्वित
भूमिपूजनप्रसंगी सिंचन योजनेचे अध्यक्ष बाळासाहेब हिवरकर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर विधाटे, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच सागर जाधव, किरण हिवरकर, अंकुश भुमकर, बाळासाहेब विधाटे, पोपट विधाटे, संतोष भुमकर, रूपेश विधाटे, हरिचंद्र गवंडी, अमोल जाधव, संदीप भुमकर, दत्ता गवंडी, सुहास रोडे, महेश कदम, ॲड. दर्शना भुमकर, गणपत विधाटे, गोरक्ष हिवरकर, संजय बढेकर आदी उपस्थित होते. एक महिन्यात योजना कार्यान्वित होईल, असे उपसरपंच अक्षय विधाटे यांनी सांगितले.
योजनेबाबत सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित
गेली २० वर्षांपासून निवडणुका आल्या कि, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून आश्वासनाचे गाजर दाखवून त्यावर चर्चा घडवली जाते. निवडणुका झाल्या कि, तो विषय पुन्हा मागे पडतो. अनेकदा या योजनेचे वेगवेगळ्या ठिकाणावरून सर्व्हेक्षण झाले आहे. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. आम्ही विरोधी पक्षात असल्याने आमचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हणणारे ही आता सत्ताधारी पक्षात असल्याने या योजनेबाबत सर्वसामान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
05459
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.