जुन्नर, ता. ६ : तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे आलेल्या शिवभक्तांना मधमाश्यांचा हल्ल्याला सामोरे जावे लागल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) घडली. मधमाशांच्या हल्ल्याच्या घटनेने शिवभक्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले शिवनेरी परिसरात मधमाशांच्या हल्ल्यांचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, तर गडावर येणाऱ्या शिवभक्तांनी तसेच पर्यटकांनी देखील सुरक्षेच्या अनुषंगाने वनविभागाने निर्देशित केलेल्या नियमावलीचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती किल्ले शिवनेरीवर साजरी केली जाते. या जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त किल्ले शिवनेरीवर येत असतात. सकाळी अकराच्या सुमारास शिवजन्मस्थळाजवळील कडेलोटाकडून परतत असलेल्या शिवभक्तांवर अचानक आलेल्या मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात विकास मोहन जामदार व धनंजय विजय दाभाडे (दोघेही राहणार चिखली) हे जखमी झाले आहेत, त्यापैकी एक गंभीर जखमी झाला आहे.
गडावर असलेल्या वनविभागाचे कर्मचारी व उपस्थित शिवभक्तांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी हलविले. जखमींवर जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. किल्ले शिवनेरीच्या परिसरात असणारे मोठ्या आकाराचे वृक्ष, कडेकपारी हा मधमाश्यांसाठी सुरक्षित अधिवास आहे. त्यातच गडावर सायराची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या ही झाडे फुलली असल्याने मधमाशा त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे मधमाश्यांचा गडावर वावर वाढला आहे.
गडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटक यांनी सुगंधी द्रव्ये मारू नये. रंगीबेरंगी कपडे, फटाके फोडणे असे प्रकार करू नयेत. तसेच मधमाश्यांचा हल्ला झालाच तर स्तब्ध उभे रहावे, हातवारे करू नये, झटकू नये अशी काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने केले आहे. गतवर्षी देखील मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून त्यात शिवभक्त जखमी झाले होते.
गतवर्षी तिथीनुसार झालेल्या शिवजयंतीच्या दिवशी देखील हल्ल्याची घटना घडली होती. १६ व १७ मार्च २०२५ रोजी दोन दिवसांत झालेल्या हल्ल्यात जवळपास पन्नासहून अधिक जण जखमी झाले होते. २० एप्रिल २०२५ रोजी गडाच्या पहिल्या दरवाजापाशी झालेल्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले होते तर शिवाई देवीच्या यात्रेदरम्यान ३० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हल्ल्यात १५ ते २० जण जखमी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.