बारामती, ता. १८ ः केंद्र शासनाने शहरी भूअभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील १५२ नगरपालिकांत ‘नक्शा’ प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. राज्यात बारामतीसह दहा नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश असून, बारामती नगरपरिषद क्षेत्रात मंगळवारपासून (ता. १८) या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहराच्या हद्दीतील ५२ चौरस किलोमीटर भूभागांचे सर्वेक्षण याअंतर्गत करण्यात येणार आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशातील रायसेन येथे नक्शा (राष्ट्रीय भौगोलिक माहिती आधारित शहरी भूमापन) प्रकल्पाचा प्रारंभ केला. बारामतीत या कार्यक्रमाचे दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सर्वे ऑफ इंडिया अधिकारी भूपेंद्र परमार, उपविभागीय अधिकारी बारामती वैभव नावडकर, जिल्हा भूमी अधीक्षक सूर्यकांत मोरे, मुख्याधिकारी महेश रोकडे, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळराजे मुळीक, नितीन हाट्टे व नागरिक उपस्थित होते.
नक्शा प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भू-संसाधन विभागांतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पाद्वारे शहरी भूअभिलेखांचे आधुनिकीकरण, भूमालकीची स्पष्टता आणि भू-विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाणार असल्याचे संजय धोंगडे यांनी नमूद केले.
असा आहे प्रकल्प
आधुनिक भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) मदतीने भूमापन प्रक्रिया सुधारली जाईल.
सर्वे ऑफ इंडिया तांत्रिक भागीदार असून, ड्रोनच्या साहाय्याने हवाई सर्वेक्षण केले जाईल.
यामुळे सुधारित नकाशे तयार करून व त्यांची मालकीबाबत हक्क चौकशी करून अधिक अचूक भूअभिलेख तयार करता येतील.
अचूक भूअभिलेखामुळे भूमालकीशी संबंधित वाद कमी होतील.
जमिनीची पत वाढेल, नगरपालिकेला शहरी विकास आराखडे तयार करताना जीआयएस तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.
मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये स्पष्टता राहील आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवता येईल.
स्थावर मालमत्तेचा अद्ययावत नकाशा उपलब्ध झाल्याने कर आकारणी अधिक प्रभावी होईल.
या दहा नगरपालिकांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविणार
महाराष्ट्रातील पंढरपूर, बारामती, कुळगाव बदलापूर, शिर्डी, वरणगाव, कन्नड, बुलडाणा, घुग्घस, खोपोली आणि मूर्तिजापूर या १० शहरात या प्रकल्पाचा पथदर्शी प्रयोग होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.