पुणे

लिमटेकमध्ये कालव्यावाला भगदाड

CD

बारामती, ता. २५ : तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने बारामतीकरांची दाणादाण उडविली. रविवारी अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे काही नागरिकांचे नुकसान झाले. तसेच, लिमटेक (ता. बारामती) येथे ३१ फाट्याजवळ नीरा डाव्‍या कालव्याला भगदाड पडले. त्यामुळे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या घरामध्ये घुसले. तसेच, शेतजमीन वाहून गेली. बारामती- इंदापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.
कालव्याचे पाणी काटेवस्ती परीसरातील सुमारे २५ ते ३० नागरिकांच्या घरामध्ये घुसल्यामुळे नागरिकांची धावपळ झाली. धान्य, कपडे व संसारोपयोगी वस्तु पाण्यामध्ये वाहून गेल्या. तसेच, कालव्याचे पाणी शेतांमधून वाहून गेल्याने शेतजमीन ही वाहून गेली. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून पावसाचे पाणी वाहत असल्याचे कन्हेरीचे माजी सरपंच सतीश काटे यांनी सांगितले.
सुदैवाने कालव्याचा प्रवाह बंद करण्यात आला असल्याने काही काळानंतर पाणी ओसरले. मात्र, या पाण्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आजूबाजूच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नुकसान झाले. सात जण एका घरात अडकले होते. त्यांनाही बारामती नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. कालवा फुटल्याने काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण होते. मात्र, ग्रामस्थांचे अगोदरच स्थलांतर केलेले असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्यासह अधिकारी घटनास्थळी धावून गेले.
बारामती शहरातील पाटस रस्त्यावरील देशमुखनगर परिसरात ओढ्याचे पाणी घुसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. फलटण रस्त्यावरील काही घरांत, तसेच तांदुळवाडीतील काही घरांमध्येही पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले. पावसाची तीव्रता कमालीची होती. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण होते. जळोची स्मशानभूमीजवळच्या ओढ्याला अचानकच पाणी आल्याने जळोची परिसरातील सत्तरहून अधिक घरे पाण्यात गेली. रुई परिसरातही अभिमन्यू कॉर्नरपासून पाणी साचून राहिले होते. तेथेही अनेक घरात पाणी शिरले.
तांबेनगर परिसरातील अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले होते. एका ठिकाणी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भिंत तोडून पाण्याला वाट करून दिली. जळोचीमध्ये काही स्थानिक नागरिकांनी इतरांना निवासाची सोय करून दिली. तांदुळवाडीतील समाजमंदिरात तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था केली गेली. रुई येथील शाळेमध्ये व्यवस्था केली आहे.

फेरआढावा घेण्याची गरज
शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी निचरा होण्यासाठीची प्रभावी सोयच नाही. त्यामुळे रविवारी शहरालगतच्या अनेक घरांना त्याचा फटका बसला. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शास्त्रोक्त प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्याची गरज या पावसाने अधोरेखित केली आहे.

पहाटे चारपासून प्रशासन मैदानात
बारामतीतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी पंकज भुसे, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, संतोष तोडकर, सुनील धुमाळ यांच्यासह अग्निशामक दलाची टीम शहराच्या विविध भागात नागरिकांच्या मदतीला धावून जात होती. काही ठिकाणी जेसीबी यंत्र लावून पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न होत होता.


बारामती, इंदापुरातील स्थिती
- नीरा डावा कालवा फुटल्यानंतर सात जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले गेले.
- जांब कुरवलीजवळ बंधाऱ्याचे काम करणारे दोन मजूर पोकलेन मशिनवर चढून बसलेले होते, त्यांची सुटका करण्यात आली.
- बारामतीत विद्या प्रतिष्ठान मागील बाजूस एका जणाची पाण्यातून सुटका करण्यात आली.
- बारामती एमआयडीसीतील तीन अपार्टमेंटमधील नागरिकांना
स्थलांतराच्या सूचना करण्यात आल्या. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.
- बारामती व इंदापूर तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने एनडीआरएफच्या दोन तुकड्या बोलावण्यात आल्या

मॉन्सूनपूर्व पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात बारामती परिसरात कधीच पडत नाही. तीन दिवसात बारामती, पिंपळी, लिमटेक, काटेवाडी पट्ट्यात अतिवृष्टी झाल्याने ओढे- नाल्याचे पाणीही नीरा डावा कालव्यात आले. त्यामुळे कालव्याची वहनक्षमता अचानक वाढली. सगळीकडून आलेले पाणी कालव्यात आल्याने दाब वाढला व त्याने कालव्याला भगदाड पडले. सुदैवाने काल रात्रीच नीरा डावा कालवा बंद केलेला असल्याने नुकसानीची तीव्रता तुलनेने कमी राहिली. हा कालवा फुटणार असे लक्षात आल्यानंतर अगोदरच्या फाट्यातून व जेथून शक्य आहे तेथून कालव्याचे पाणी बाहेर काढत नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला.
- दिगंबर डुबल, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : प्रमुख मंदिरांच्या अधिकारांमध्ये मोठा बदल; धर्मदाय आयुक्तालयाकडे संपूर्ण सूत्रे

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT