बारामती, ता. ६ : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनांकरिता पसंती क्रमांक मिळण्याबाबत जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एकूण १० हजार २६८ अर्ज स्वीकारण्यात आले असून त्यातून ११ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.
नागरिकांचा वाढता प्रतिसाद, सेवा सुलभीकरण, पारदर्शकप्रक्रिया आणि विभागातील कार्यक्षम अंमलबजावणीमुळे महसूल जमा झाल्याचे त्यांनी नमूद केले. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण ४ हजार ९१९ अर्जाच्या माध्यमातून ४ कोटी १८ लाख तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्राप्त ५ हजार ३४९ अर्जाच्या माध्यमातून ६ कोटी ८३ लाख इतका महसूल प्राप्त झाला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात पसंती क्रमांकाच्या माध्यमातून प्राप्त महसुलात सुमारे ६३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तसेच वाहन क्रमांक वाटपाच्या संख्येतही सुमारे ९ टक्क्यांची वाढ झाल्याचेही निकम यांनी सांगितले.